गटशिक्षणाधिकाऱ्यांना वाहन देण्याचा प्रस्ताव मंजूर; सोलापूर "झेडपी'च्या शिक्षण विभागाचा निर्णय 

संतोष सिरसट
Thursday, 22 October 2020

नुकसान झालेल्या शाळांची द्या माहिती 
जिल्ह्यात मागील काही दिवसामध्ये पावसाच्या अतिवृष्टीमुळे काही तालुक्‍यात पूरस्थिती निर्माण झाल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वर्गखोल्यांचे नुकसान झाले आहे. शाळेचे दप्तर गहाळ झाले आहे, अशा शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती सादर करण्याच्या सूचना आजच्या बैठकीत गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या. 
दिलीप चव्हाण, उपाध्यक्ष तथा सभापती, शिक्षण समिती. 

सोलापूर ः प्राथमिक शिक्षण विभागाकडे कार्यरत असणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना चारचाकी वाहन व त्यामध्ये इंधनासाठी तरतूद उपलब्ध व्हावी, याबाबतची चर्चा आज झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आली. या चर्चेअंती तशा प्रकारचा प्रस्ताव करून मंजुरीसाठी तो शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय पार्क चौकातील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वस्तीगृहाच्या इमारतीचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यासाठी पुण्याच्या एका कॉलेजची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती दिलीप चव्हाण यांनी दिली. 

श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज सभा झाली. या सभेसाठी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भास्करराव जाधव उपस्थित होते. प्राथमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून नेहरू विद्यार्थी वसतीगृह, शेळगी परिसरातील सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह व पंढरपूर येथील मुलांचे वसतिगृह चालविले जाते. या तीन वस्तीगृहांच्या देखभाल दुरुस्तीसाठी, व्यवस्थापनासाठी दरवर्षी शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून प्रशासकीय मंजुरी दिली जाते. त्या पुढील कामकाज बांधकाम विभागाकडून करण्यात येते. वसतिगृहामध्ये विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया शिक्षण विभागाकडे ठेवून वसतीगृह व्यवस्थापन व दुरुस्तीचे काम बांधकाम विभागाकडे सोपविण्यात यावे किंवा त्यासाठी आऊटसोर्सिंग व्यवस्थापन नियुक्त करता येते का? यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण खात्याचे प्रमुख यांच्यामध्ये बैठक आयोजित करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. नेहरू वस्तीगृहाच्या इमारत दुरुस्तीपूर्वी स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यासाठी "सीईओपी' कॉलेज पुणे या संस्थेला मंजुरी दिली आहे. याशिवाय दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील नवलेवस्ती ही शाळा विद्यार्थ्यांच्या पटाअभावी बंद करण्यास आजच्या सभेत मंजुरी दिली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Approved the proposal to provide vehicles to group education officers; Decision of the Education Department of Solapur "ZP"