Arali_GP
Arali_GP

जादू केवळ एका मताची ! अरळीतील उमेदवारासह अख्खा पॅनेल विराजमान झालाय सत्तेच्या खुर्चीत 

मंगळवेढा (सोलापूर) : केवळ एका मताने उमेदवार राजा बनू शकतो किंवा एक मत कमी पडल्याने तो रंकही बनू शकतो, याचा अनुभव भारतीय लोकशाहीतील निवडणुकांमध्ये अनेकवेळा आलेला आहे. त्यामुळे एका मताची किंमत काय असते, याचा अनुभव निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराला जसा असतो, तसाच मात्र उलटा अनुभव मंगळवेढा तालुक्‍यातील 23 ग्रामपंचायतीमधील भीमा काठच्या अरळी ग्रामपंचायत निवडणुकीत विद्यमान पंचायत समितीचे सदस्य रमेश भांजे यांच्या गटाला आला आहे. केवळ एका मतामुळे उमेदवारच नव्हे तर त्यांच्या गटाला सत्तेत बसण्याची संधी मिळाली आहे. 

ऊस पट्ट्यात असलेल्या प्रमुख गावात अरळी गावाचा समावेश असून, बागायत क्षेत्रामुळे या भागात उत्पन्नाचे साधन असले तरी गौण खनिजच्या माध्यमातून ग्रामपंचायतला मोठ्या प्रमाणात निधी मिळत आहे. त्यामुळे साहजिकच गावगाड्यातील सत्तेमध्ये आपले वर्चस्व असावे, अशी भावना वाढीस लागली. भालके समर्थक म्हणून ओळखले जाणारे पंचायत समितीचे सदस्य रमेश भांजे यांचे राजकीय वरदहस्त देखील या भागात प्रभावी मानले जात आहे. 

लोकसभा, विधानसभा यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबरोबरच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्यांचा प्रभाव दिसून येतो. ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले गट हे साखर कारखानदारांच्या अध्यक्षांशी संबंधित कार्यकर्त्यांचे गट असल्यामुळे या निवडणुकीत कोणता गट बाजी मारतो, याची उत्सुकता लागली असतानाच, अरळी ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एक जागा भांजे गटाला यापूर्वीच शारदाबाई भैरगोंडे यांच्या रूपाने बिनविरोध झाली आहे. त्यामुळे दहा जागांसाठी झालेली निवडणूक मोठ्या चुरशीने झाली. 

या निवडणुकीत भांजे गटाला आमदार परिचारक व आवताडे समर्थकांनी मोठी टक्कर दिली आहे. दोन्ही गटांना प्रत्येकी 5 जागा मिळाल्या. परंतु भांजे गटाला सत्तेसाठी आवश्‍यक सहा जागा मिळाल्या असल्या तरी व भांजे गटाच्या उषा भांजे या प्रभाग दोनमधील उमेदवारास एकूण 215 मते मिळवून विजयी झाल्या असल्या तरी त्यांच्या विरोधी गटातील उमेदवाराला 214 मते मिळाली. त्यामुळे केवळ एका मतामुळे त्या विजयी झाल्याने भांजे गटालाही केवळ एका मतामुळे सत्तेत विराजमान होता आले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com