मुख्यमंत्र्यांच्या येण्यावरून पंढरीत उलट सुलट प्रतिक्रिया 

प्रशांत देशपांडे 
रविवार, 28 जून 2020

सर्वात मोठी असणारी आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर यंदा ही वारी रद्द करण्यात आली आहे. मात्र, मानाच्या सात पालख्या पंढरपुरात विमानाने किंवा बसने आणण्यात येणार आहेत. दरम्यान, पंढरपुरात संचारबंदी लागू केली आहे. यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानाची दखल घेत अखिल भारतीय वारकरी मंडळाने त्यांना पाठिंबा दिला आहे. 

सोलापूर : कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर जर तीर्थक्षेत्र पंढरपुरात आषाढी वारीसाठी वारकऱ्यांना येण्यास बंदी असेल तर मुख्यमंत्र्यांनी तरी आषाढी एकादशी दिवशीच्या श्री विठ्ठल-रुक्‍मिणीच्या शासकीय महापूजेसाठी पंढरीत का यावे याचा विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला पाहिजे, असे चर्चेतील विधान आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. दरम्यान, त्यांच्या या भूमिकेशी पंढरपुरातील काही महाराज, वारकरी मंडळींनी सहमती दर्शवत मुख्यमंत्र्यांच्या पंढरपूर दौऱ्यावर प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. असे असले तरी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पंढरपुरात येणार असल्याचे जाहीर केले. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या येण्यावरून पंढरीत उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. 

सर्वात मोठी असणारी आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर यंदा ही वारी रद्द करण्यात आली आहे. मात्र, मानाच्या सात पालख्या पंढरपुरात विमानाने किंवा बसने आणण्यात येणार आहेत. दरम्यान, पंढरपुरात संचारबंदी लागू केली आहे. यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानाची दखल घेत अखिल भारतीय वारकरी मंडळाने त्यांना पाठिंबा दिला आहे. 

आषाढी एकादशीदिवशी श्री विठ्ठल-रुक्‍मिणीच्या महापूजेचा मान मुख्यमंत्र्यांचा असतो. जर वारकरीच पंढरीत येणार नसतील तर मुख्यमंत्र्यांनी देखील यावे की नाही याचा विचार करावा. कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव असल्यामुळे पंढरपुरात संचारबंदी लागू केली आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी देखील या गोष्टीचा विचार करून श्री विठ्ठल-रुक्‍मिणीच्या महापूजेसाठी जावे की नाही याचा विचार करावा या विधानाला अखिल भारतीय वारकरी मंडळाने पाठिंबा दिला आहे. 

मुख्यमंत्र्यांनी विचार करावा 
कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर आषाढी वारी असूनही पंढरपुरात वारकऱ्यांनी येऊ नये म्हणून संचारबंदी लावण्यात आली आहे. एकादशीदिवशी महापूजेचा मान मुख्यमंत्र्यांना असतो. मात्र, पंढरीत संचारबंदी असल्याने त्यांनी यावे की नाही याचा विचार त्यांनी करावा. आमदार पडळकर यांनी देखील मुख्यमंत्र्यांनी यावे की नाही याचा विचार करावा असे विधान केले आहे. या विधानाला अखिल भारतीय वारकरी मंडळाचा पाठिंबा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे समजूतदार आहेत, त्यांनी विचार करावा. 
- प्रकाश महाराज बोधले, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय वारकरी मंडळ 

मुख्यमंत्र्यांनी पंढरीत यावे 
आषाढी वारीत लाखो वारकरी पंढरीत येत असतात. या वारकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या राज्याच्या प्रमुखापुढे मांडता येतात. जेणेकरून त्यांनी वारकऱ्यांच्या समस्या ऐकून त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे यंदा देखील मुख्यमंत्र्यांनी आषाढी वारीच्या दिवशी पंढरीत येऊन श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची महापूजा करावी. 
- सुधाकर महाराज इंगळे, प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय वारकरी मंडळ 

मुख्यमंत्री म्हणाले, मी पंढरीला जाणार..! 
आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय महापूजा महाराष्ट्राचे तमाम नागरिक व वारकऱ्यांचा प्रतिनिधी या नात्याने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची दीर्घकालीन प्रथा आहे. त्यामुळे यंदा देखील आषाढी एकादशी दिवशी मी स्वतः महापूजेसाठी तीर्थक्षेत्र पंढरपूरला जाणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीत दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the arrival of Chief Minister Uddhav Thackeray in Pandharpur there was a mixed reaction