बार्शी तालुक्‍यात वाढला निवडणुकीचा ज्वर ! गाव कारभाऱ्यांकडून सुरू बैठका 

कुलभूषण विभूते 
Wednesday, 30 December 2020

गावच्या चावडीवर, वस्त्यांवर आणि घरोघरी निवडणुकीच्याच गप्पा चालल्या असल्याचे सर्रास दिसत आहे. एखादा आपल्याकडे येत नसल्यास त्याची मनधरणी करून आपल्याकडे वळविण्याचे काही जण प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी त्याची थकलेली घरपट्टी, पाणीपट्टी जमा करणे, अगदी घराचे लाईट बिलेही भरून दिली जात आहेत. 

वैराग (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यात 95 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या वैरागसह, उपळाई (ठोंगे), गौडगाव, उपळे दुमाला, पांगरी, मालवंडी, आगळगाव, शेळगाव, रातंजन, सारोळे, नारी, खामगाव, चिखर्डे, कोरफळे, श्रीपतपिंपरी, खांडवी, बावी आदी 11, 13, 15 ग्रामपंचायत सदस्य संख्या असलेल्या गावात मोठी चुरस दिसू लागली आहे. 

वर्ष - महिना अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. तर नवीन वर्षात मतदान व निकाल जाहीर होणार आहे. यामुळे निवडणूक आयोगाने सर्वांनाच धक्का देत थेट कार्यक्रम जाहीर करून टाकल्याने सर्वांची एकच धावपळ सुरू झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र शांतता असल्याने निवडणुका प्रक्रियेबाबत गाव कारभारी शांतच होते. परंतु आता कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्वच जण अगदी अंग झाडून कामाला लागले आहेत. प्रत्येक वॉर्डमध्ये उमेदवार कोण असावा, त्याचे गावात कुणाशी कसे संबंध आहेत इथंपासून सर्व माहिती गावकीत मांडून विचारमंथन केले जात आहे. 

प्रत्येक वॉर्डमधील एकूण मतदान, त्यापैकी आपल्याला किती आणि समोरच्याला किती पडतील, राहिलेली मते कशी मिळवायची याची खलबते सुरू आहेत. गावकी- भावकीमधील कितीही जुनी भांडणे, वाद असो ती या निवडणुकीत निघतातच. त्यामुळे त्याचा मतांवर परिणाम होऊ नये यासाठी गावागावातील तंटामुक्ती समित्या, गाव कारभारी, आपापले पॅनेल प्रमुख समोरासमोर घेऊन मिटविण्याच्या प्रयत्नात असताना दिसत आहेत. गावच्या चावडीवर, वस्त्यांवर आणि घरोघरी निवडणुकीच्याच गप्पा चालल्या असल्याचे सर्रास दिसत आहे. एखादा आपल्याकडे येत नसल्यास त्याची मनधरणी करून आपल्याकडे वळविण्याचे काही जण प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी त्याची थकलेली घरपट्टी, पाणीपट्टी जमा करणे, अगदी घराचे लाईट बिलेही भरून दिली जात आहेत. तर ज्येष्ठांना निराधार पगार चालू करू, घरकुल बांधून देऊ अशी अश्वासनेही मिळत आहेत. जेवणाच्या पार्ट्या कोठे आणि कशा करायच्या, आदींबाबत अगदी बारकाईने नियोजन केले जात आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The atmosphere of Gram Panchayat in Barshi taluka is heating up