विजयाच्या तिळगुळाची चव कोण चाखणार? पराभवाची "संक्रांत' कोणावर कोसळणार?

रमेश दास 
Wednesday, 13 January 2021

गावातील एकूण मतदारांपैकी साधारण चाळीस-चाळीस टक्के मतदार हे दोन्ही पार्ट्यांचे कट्टर असतात. ते कुठंच जात नाहीत आणि कोणत्याच आमिषेला बळी पडत नाहीत. मात्र वीस टक्के मतदार हे अत्यंत चलाख असल्याने दोन्ही पार्ट्यांकडील "लक्ष्मी' पदरात पाडून "आम्ही तुम्हालाच मत देणार' असे सांगतात; मात्र ते कोणाला मत देतात, याबाबत त्यांचा अंदाज लागत नाही. या वीस टक्के मतदारांवरच पार्टीच्या विजयाचे गणित जुळत असते. 

वाळूज (सोलापूर) : यावेळची ग्रामपंचायत निवडणूक ऐन संक्रांतीच्या सणात असल्याने "पराभवाची संक्रांत कोणावर कोसळणार? आणि विजयाच्या तिळगुळाची चव कोणाला चाखायला मिळणार?' याकडे संपूर्ण तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. 

मोहोळ तालुक्‍यातील 76 ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल ते डिसेंबर 2020 मध्ये संपल्याने निवडणूक लागली आहे. त्यापैकी 13 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. 63 ग्रामपंचायतींमधून 1234 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावर्षीची निवडणूक ऐन संक्रांतीच्या सणात असल्याने पराभवाची संक्रांत कोणावर बसणार? आणि कोणाला विजयाच्या तिळगुळाची चव चाखायला मिळणार? याकडे संपूर्ण तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असून, काही अपवाद वगळता बहुतांश गावांत राष्ट्रवादीच्याच दोन गटांत सामना रंगला आहे. गाव पातळीवरच्या या अत्यंत चुरशीच्या होणाऱ्या निवडणुकीत ग्रामीण भागातील भल्या- भल्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

नरखेड, पेनूर, पाटकुल, पापरी, शेटफळ, खंडाळी, आष्टी, लांबोटी, कुरुल, सय्यद वरवडे, कामती, सावळेश्वर, वाळूज (दे), देगाव (वा), सौंदणे यासह सर्वच गावांतील लढती अटीतटीच्या होणार आहेत. प्रत्येक गावातील परस्पर विरोधी गट आपलीच पार्टी गुलाल उधळणार, असे छातीठोकपणे सांगत असले, तरी 15 तारखेला होणारे मतदान आणि 18 तारखेला होणाऱ्या मतमोजणीनंतरच बाजी कोण मारणार? आणि विजयाचा गुलाल कोण उधळणार? व संक्रांत कोणत्या पार्टीवर कोसळणार? हे कळणार आहे. 

इतर पंचवार्षिक निवडणुकांपेक्षा ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची होते. आपलीच सत्ता यावी म्हणून परस्पर विरोधी गट मतदारांवर साम, दाम, दंड, भेद यांसह विविध युक्‍त्या वापरून मतदान आपल्याच पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. एक-एक मत महत्त्वाचे असल्याने मतांसाठीचा "घोडेबाजार' तेजीत राहणार आहे. गावातील एकूण मतदारांपैकी साधारण चाळीस-चाळीस टक्के मतदार हे दोन्ही पार्ट्यांचे कट्टर असतात. ते कुठंच जात नाहीत आणि कोणत्याच आमिषेला बळी पडत नाहीत. मात्र वीस टक्के मतदार हे अत्यंत चलाख असल्याने दोन्ही पार्ट्यांकडील "लक्ष्मी' पदरात पाडून "आम्ही तुम्हालाच मत देणार' असे सांगतात; मात्र ते कोणाला मत देतात, याबाबत त्यांचा अंदाज लागत नाही. या वीस टक्के मतदारांवरच पार्टीच्या विजयाचे गणित जुळत असते, असे गावा- गावांतील जाणकार ओळखून असतात. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The atmosphere of Gram Panchayat elections is hot during Sankranti festival