आरक्षणाआधीच उमेदवारांना पडताहेत सरपंचपदाची स्वप्ने ! करमाळ्यात बिनविरोधची शक्‍यता मात्र धूसरच

राजाराम माने 
Monday, 28 December 2020

गावपातळीवर गावांमध्ये आपली पकड मजबूत राहावी यासाठी राजकीय पक्ष ग्रामपंचायतीकडे एका वेगळ्याच नजरेने पाहात आले आहेत. तरीही स्थानिक पातळीवरील बहुतांश ठिकाणी या निवडणुका पक्षीय पातळीवर न लढता स्थानिक पातळीवर समविचारी आघाडी करूनच लढविल्या जातात. त्यातच या निवडणुकांनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असल्याने जरा वेगळेच महत्त्व ग्रामपंचायतींना प्राप्त होत आहे. 

केत्तूर (सोलापूर) : एकीकडे थंडीचा कडाका वरचेवर वाढत असतानाच करमाळा तालुक्‍यात होत असलेल्या 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा आखाडाही तापू लागला आहे. त्यातच सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर होणार असल्याने पॅनेलप्रमुखांची मात्र चांगलीच दमछाक होणार आहे, तर अनेक ठिकाणी बहुतांश जणांना आरक्षणाआधीच सरपंचपदाची स्वप्नेही पडू लागली आहेत. त्यामुळे रुसवे-फुगवे काढण्यातच बहुतांशी वेळ वाया जाणार आहे. 

गावपातळीवर गावांमध्ये आपली पकड मजबूत राहावी यासाठी राजकीय पक्ष ग्रामपंचायतीकडे एका वेगळ्याच नजरेने पाहात आले आहेत. तरीही स्थानिक पातळीवरील बहुतांश ठिकाणी या निवडणुका पक्षीय पातळीवर न लढता स्थानिक पातळीवर समविचारी आघाडी करूनच लढविल्या जातात. त्यातच या निवडणुकांनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असल्याने जरा वेगळेच महत्त्व ग्रामपंचायतींना प्राप्त होत आहे. 

करमाळा तालुक्‍यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुराळा उडू लागला आहे. जातीचे तसेच शैक्षणिक दाखले काढण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. 23 डिसेंबरपासून अर्ज स्वीकारणे सुरू झाले असून, नवीन वर्षाच्या प्रारंभीच म्हणजे 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे व 18 जानेवारीला निकाल लागणार आहे. 

कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तालुका पातळीवरील विद्यमान आमदार संजय शिंदे गट, माजी आमदार नारायण पाटील गट, बागल गट, जयवंतराव जगताप गट सक्रिय झाले असून ग्रामपंचायत बिनविरोधकरिता काहींनी विकास कामांसाठी ठराविक रकमेच्या बक्षिसाची घोषणाही केली असली, तरी ग्रामपंचायत बिनविरोध होण्याचे संकेत मात्र धूसरच आहेत. 

करमाळा तालुक्‍यातील निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये कुंभेज, अर्जुननगर, हिवरवाडी, मांगी, मिरगव्हाण, पाडळी, पांडे, पांगरे, पाथुर्डी, पोटेगाव, सांगवी, सरपडोह, शेलगाव (क), आळजापूर, बाळेवाडी, देवीचामाळ, गुळसडी, सौंदे, वडगाव, पुनवर, देवळाली, शेटफळ, बोरगाव, बिटरगाव श्री, पोथरे, घारगाव, हिवरे, निमगाव हवेली, उमरड, सावडी, मलवडी, भोसे, रोशेवाडी, फिसरे, करंजे, ढोकरी, कविटगाव, जेऊरवाडी, साडे, कोंढेज, सालसे, कुगाव, कोळगाव, जातेगाव, पिंपळवाडी, दिलेश्वर, झरे, आळसुंदे, नेरले, केडगाव, हिसरे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत मात्र मिळत असून, गावातील ज्येष्ठ नेत्यांनीही तरुणांना वाव व संधी देण्याची गरज आहे. तालुक्‍यातील 105 ग्रामपंचायतींपैकी निम्म्या म्हणजेच जवळजवळ 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. तालुका पातळीवरील गट सक्रिय झाले असून या निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतील, अशी सर्वांनाच आशा आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The atmosphere of Karmala Gram Panchayat elections is heating up