रेशन दुकानातील धान्यवाटपाचा वाद पोचला ऍट्रॉसिटी व विनयभंगापर्यंत! दोन गटांतील 16 जणांविरुद्ध गुन्हे 

हुकूम मुलाणी 
Thursday, 17 September 2020

तालुक्‍यातील शिरनांदगी येथे स्वस्त धान्य दुकानातील माल वाटपाच्या कारणावरून दोन गटांत वाद झाला. यातून परस्परविरोधी दाखल झालेल्या फिर्यादीवरून 16 जणांवर ऍट्रॉसिटी व विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यातील शिरनांदगी येथे स्वस्त धान्य दुकानातील माल वाटपाच्या कारणावरून दोन गटांत वाद झाला. यातून परस्परविरोधी दाखल झालेल्या फिर्यादीवरून 16 जणांवर ऍट्रॉसिटी व विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

शिरनांदगी येथील स्वस्त धान्य दुकानातील मालाचे वितरण व्यवस्थित होत नसल्याच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपूर्वी तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रार अर्जामध्ये, हे दुकान गावातील एका बचत गटाला दिल्यास तो धान्याचे वाटप व्यवस्थित करेल, असे नमूद केले. ही तक्रार राजकीय हेतूने केल्याची भावना दुसऱ्या गटाची निर्माण झाली.

दरम्यान, तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदारांनी चौकशी करण्यासाठी घटनास्थळी सकाळी 10 वाजता हजर राहण्यास फिर्यादी व तक्रारदारास सांगितले. त्या वेळी धान्याची पोती उतरवत असताना पहिल्या घटनेतील 50 वर्षीय फिर्यादीचा मुलगा देविदास व आकाश खांडेकर यांनी मोबाईलमध्ये माल उतरवतानाचे व्हिडीओ चित्रीकरण करताना रेशन दुकानदार सुनील कांबळे याने जातिवाचक शिवीगाळ करून, तुमचे इथे काय काम आहे, असे म्हणत फिर्यादीच्या वस्त्राची ओडाओढ केली. या झटापटीत फिर्यादीचे मंगळसूत्र गळून पडले व फिर्यादीचा नवरा मध्ये पडल्यावर त्यालाही सुनील कांबळे याने मारहाण केली तसेच मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. या प्रकरणी स्वस्त धान्य दुकानदार सुनील कांबळे, प्रकाश किसवे, अंकुश किसवे, महादेव खताळ, सचिन खांडेकर, बाबूराव थोरबोले, महेश मासाळ, परमेश्वर खांडेकर, गणेश कांबळे, विठ्ठल पाटील, यशवंत कांबळे (सर्वजण रा. शिरनांदगी) यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक व विनयभंग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्याकडे देण्यात आला. 

दुसऱ्या घटनेची फिर्याद 23 वर्षीय महिलेने दिली असून त्यात म्हटले, की नारायण खांडेकर, आकाश खांडेकर, बाळाबाई गायकवाड, गजानन गायकवाड, देविदास गायकवाड हे मोटरसायकलवरून फिर्यादीच्या घरासमोर आले. तुमचे रेशन दुकान बंद करावयाचे आहे, तुम्ही आम्हाला माल व्यवस्थित देत नाही असे म्हणत फिर्यादीच्या पतीस दमदाटी व शिवीगाळ करू लागले. त्यामुळे या वादात कोणीतरी मारेल या भीतीपोटी फिर्यादी मध्ये पडली असता फिर्यादीच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. एकूणात स्वस्त धान्य दुकानातील वाद व धान्य वाटपावरून सुरू झालेला वाद ऍट्रासिटी व विनयभंगापर्यंत येऊन पोचला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atrocities and molestation cases filed after a dispute between two groups in Shirnandagi