शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त श्री विठ्ठल-रुक्‍मिणीमातेला देशी-विदेशी फुलांची आकर्षक सजावट 

भारत नागणे 
Saturday, 17 October 2020

शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरवात झाली आहे. याच निमित्ताने आज विठुरायाला आणि रुक्‍मिणी मातेला तुळशीच्या पानाफुलांसह विविध देशी आणि विदेशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पुणे येथील विठ्ठलभक्त राम जांभूळकर यांनी स्वखर्चातून विठुचरणी आरास अर्पण केली आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरवात झाली आहे. याच निमित्ताने आज विठुरायाला आणि रुक्‍मिणी मातेला तुळशीच्या पानाफुलांसह विविध देशी आणि विदेशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पुणे येथील विठ्ठलभक्त राम जांभूळकर यांनी स्वखर्चातून विठुचरणी आरास अर्पण केली आहे. 

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रुक्‍मिणी मातेला आज विविध अलंकार आणि जांभळ्या रंगाची साडी परिधान करण्यात आली होती. तर मोगऱ्याच्या फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. पुढील आठ दिवस रुक्‍मिणी मातेची विविध रूपात पूजा बांधली जाणार आहे. तर विठ्ठलालाही तुळशीच्या पाना-फुलांची साजावट करण्यात आली आहे. याशिवाय मोगरा, आष्टर, गुलाब, झेंडू, जरबेरा अशा विविध देशी-विदेशी फुलांनी मंदिर सजवलं आहे. देवाचा गाभारा, प्रवेशद्वार, सोळखांबी या ठिकाणीही हार-फुलांच्या माळांनी साजवट केली आहे. सजावटीसाठी जवळपास दोन टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. फुलांच्या सजावटीमुळे देवाचे आणि मंदिराचे रूप अधिक खुलून दिसत आहे. 

आज मंदिरात मंत्रोपचारात घटस्थापना करण्यात आली 

कोरोनामुळे सात महिन्यांपासून देवाचे दर्शन बंद आहे. नवरात्रोत्सवात देखील दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. तर विविध कार्यक्रम देखील मंदिर समितीने रद्द केले आहेत. दरम्यान, मंदिरात दैनंदिन देवाचे नित्योपचार आणि धार्मिक परंपरा, कार्यक्रम आणि सण- उत्सव साजरे केले जातात, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attractive decoration of native and foreign flowers to Shri Vitthal Rukmini on the occasion of Navratri