
ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव व सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना देण्यात आले आहेत. याबाबतचा प्रस्ताव राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेला आहे. या प्रस्तावावर औपचारिकता म्हणून मुख्यमंत्री ठाकरे यांची सही राहिलेली आहे, ती सही लवकरच होईल अशी माहिती आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली.
सोलापूर : ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव व सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना देण्यात आले आहेत. याबाबतचा प्रस्ताव राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेला आहे. या प्रस्तावावर औपचारिकता म्हणून मुख्यमंत्री ठाकरे यांची सही राहिलेली आहे, ती सही लवकरच होईल अशी माहिती आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली.
सोलापूर शहरात जानेवारीमध्ये गेल्या 800 ते 900 वर्षांपासून ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रा दरवर्षी भरते. या यात्रेत सोलापूर शहरातील, शेजारच्या जिल्ह्यातील बहुसंख्य भाविक येतात. श्री सिद्धेश्वरांच्या योगदंडाचे प्रतीक अशा विविध समाजांच्या सात नंदीध्वजांसह 12 ते 16 जानेवारीच्या विविध धार्मिक कार्यक्रम होतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या यात्रेस खंड पडू नये, यात्रेत श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी, मानकरी यांनी भाविकांची संख्या मर्यादित ठेवावी, शासनाच्या निर्बंधाचे पालन करून यात्रा करण्यास मान्यता असल्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे.
प्रत्येक नंदीध्वजाचे 100 नंदीध्वजधारक असे एकूण 700 नंदीध्वजधारक व सेवेकरी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक व यात्रेतील मानकरी असे 300 भाविक मिळून एकूण एक हजार लोकांना सहभागी करावेत, असे त्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार 11 डिसेंबरला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, श्री सिद्धेश्वर पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, इतर सदस्य आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानुसार हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे ठरले. त्याचा पाठपुरावा आमदार प्रणिती शिंदें यांनी करावा, असे जिल्हाधिकारी व श्री सिद्धेश्वर पंचकमिटीने सुचविले. त्यानुसार आमदार प्रणिती शिंदे यांनी तत्काळ आपत्ती व्यवस्थापनचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला. हा प्रस्ताव तत्काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करण्यास सांगितले. त्यानुसार किशोरराजे निंबाळकर व महाराष्ट्राचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या सहीने मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल