esakal | "शिरापूर' योजने'च्या पाण्यासाठी लढणारे बाबासाहेब आवताडे 
sakal

बोलून बातमी शोधा

"शिरापूर' योजने'च्या पाण्यासाठी लढणारे बाबासाहेब आवताडे 

साखर कारखान्याचे स्वप्न अपुरे 
बाबासाहेबांनी उद्योजक बिपीनभाई पटेल यांच्या माध्यमातून गावडी दारफळ येथे साखर कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्न केले. 2011 मध्ये त्यांनी कारखान्याच्याबाबतीत केलेल्या प्रयत्नांना पक्षांतर्गत विरोधकांमुळे यश मिळाले नाही. शेतकऱ्यांसाठी तालुक्‍यात साखर कारखाना काढण्याचे त्यांचे स्वप्न अपुरे राहिले. 

"शिरापूर' योजने'च्या पाण्यासाठी लढणारे बाबासाहेब आवताडे 

sakal_logo
By
संतोष सिरसट

सोलापूर ः उत्तर सोलापूर तालुक्‍याच्या दुष्काळी भागाला उजनी धरणाचे पाणी देण्यासाठी उजनी संघर्ष समितीची स्थापना केली. त्या समितीच्या माध्यमातून पाणी मिळविण्याचा प्रयत्न करणारे वडाळ्याचे भूमिपुत्र बाबासाहेब आवताडे यांचे स्मरण या पंधरवड्यात झाल्याशिवाय राहात नाही. शिरापूर उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी लढणारा नेता म्हणून त्यांची तालुक्‍यात ख्याती होती. त्यांच्या जाण्याने ही संघर्ष समिती पोरकी झाली आहे. 

बाबासाहेब आवताडे यांचे नुकतेच निधन झाले आहे. ऐन उमेदीच्या काळात त्यांच्या जाण्याने "शिरापूर' योजनेच्या पाण्याच्या पुढील प्रवासाचे काय होणार याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माम झाले आहे. ही योजना सुरु करण्यापासून ते माळरानावर असलेल्या तालुक्‍याच्या शेतजमिनीमध्ये उजनीचे पाणी येईपर्यंत नेहमीच संघर्ष करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. मग कधी स्वपक्षाशी तर कधी विरोधकांशी दोन हात करण्याची तयारी त्यांनी ठेवली होती. माजी मुख्यमंत्री (कै.) विलासराव देशमुख, माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी राज्यमंत्री (कै.) प्रतापसिंह मोहिते-पाटील या सगळ्या नेत्यांच्या सहकार्यामुळे बाबासाहेबांनी लोकांच्या प्रश्‍नासाठी संघर्षाची सतत तयारी ठेवली होती. बाबासाहेबांच्या जोडीला नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील द्राक्ष बागायतदार किशोर पाटील, भारत गवळी यांची खंबीर साथ होती. विज्ञानाची पदवी घेतल्यानंतर त्यांनी बांधकाम व्यावसायिक म्हणून काम केले. 1981 ते 90 या काळात ते वडाळा ग्रामपंचायतीचे सदस्य, 1991 ला उत्तर सोलापूर तालुक्‍याच्या युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा, 1992 साली जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. 1993 साली त्यांनी उजनी पाणी संघर्ष समितीची स्थापना केली. त्याचे अध्यक्षपदही बाबासाहेबांकडे होते. संघर्ष समितीची स्थापना झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली नान्नज येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर या आंदोलनाची तीव्रता वाढली. 1994 साली पुणे-सोलापूर महामार्गावर बाळे येथे बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली उजनीच्या पाण्यासाठी पुन्हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 
राज्यात 1995 साली सत्तांतर झाले. शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले. बाबासाहेबांनी केलेल्या आंदोलनाला फळ मिळाले. तालुक्‍याच्या हरितक्रांतीचे स्वप्न साकार करणाऱ्या शिरापूर उपसा सिंचन योजनेच्या कामाला परवानगी मिळाली. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत "शिरापूर' योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. ही योजना मंजूर करण्यासाठी बाबासाहेबांनी खूप मेहनत घेतली. एवढेच नाही तर ही योजना पूर्ण होण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. योजना पूर्ण झाल्यानंतर तालुक्‍याच्या माळरानावर उजनीचे पाणी आले. पण, सगळ्या भागामध्ये पाणी फिरत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी उर्वरीत कामासाठीही पाठपुरावा केला. एवढेच नाही तर दुष्काळात या योजनेसाठी राखीव असलेले पाणी धरणातून सोडण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. मागील चार वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी नान्नज-मोहितेवाडी गटातून कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविली होती. मात्र, पक्षांतर्गत विरोधामुळे त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. पक्षांतर्गत विरोधामुळे त्यांना जरी पराभव पत्करावा लागला असला तरी शिरापूर उपसा सिंचन योजनेच्या उर्वरित कामासाठी त्यांचा पाठपुरावा सुरुच होता. कोणत्या अधिकाऱ्यांकडे शिलापूर योजनेचे काम आहे, त्यांच्यांकडे जाऊन ते काम सुरु करण्यासाठी बाबासाहेब मनापासून प्रयत्न करत होते. तालुक्‍यात शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी मिळावी ही त्यांची धडपड सर्वसामान्यांन शेतकऱ्यांना भावणारी होती. शिरापूर उपसा सिंचन योजनेच्या उर्वरित कामासाठी आता त्यांच्यासारखा पाठपुरावा करणारा तालुक्‍यातील कोणता नेता पुढे येतो यावर ती योजना खऱ्या अर्थाने परिपूर्ण होईल, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून तालुक्‍याच्या दुष्काळी पट्याच्या शेवटच्या टोकापर्यंत जेव्हा पाणी शेतकऱ्यांचे शिवार भिजवील, तीच खरी बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरणार आहे.