esakal | शिक्षक उमेदवार माजी आमदार दत्तात्रय सावंत यांचा राष्ट्रवादीशी काडीचाही संबंध नाही : बळिराम साठे 
sakal

बोलून बातमी शोधा

Sawant, Sathe

कोणी उमेदवार राष्ट्रवादीचा किंवा कार्यकर्त्यांचा पाठिंबा असल्याची अफवा पसरवत असेल तर अशा अफवांवर कार्यकर्त्यांनी व शिक्षकांनी विश्वास ठेवू नये. अपक्ष उमेदवार माजी आमदार दत्तात्रय सावंत यांचा राष्ट्रवादीशी काडीचाही संबंध नाही, असे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष बळिराम साठे यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. 

शिक्षक उमेदवार माजी आमदार दत्तात्रय सावंत यांचा राष्ट्रवादीशी काडीचाही संबंध नाही : बळिराम साठे 

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : पुणे विभागीाय शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर आणि पदवीधरमधून अरुण लाड यांना मोठ्या मताधिक्‍याने विजयी करण्याचा निर्धार सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीने केला आहे. अपक्ष उमेदवार माजी आमदार दत्तात्रय सावंत यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही, असे स्पष्टीकरण सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष बळिराम साठे यांनी "सकाळ'शी बोलताना केले. 

श्री. साठे यांनी, राष्ट्रवादीचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. कोणी उमेदवार राष्ट्रवादीचा किंवा कार्यकर्त्यांचा पाठिंबा असल्याची अफवा पसरवत असेल तर अशा अफवांवर कार्यकर्त्यांनी व शिक्षकांनी विश्वास ठेवू नये. अपक्ष उमेदवार माजी आमदार दत्तात्रय सावंत यांचा राष्ट्रवादीशी काडीचाही संबंध नाही, असे स्पष्ट केले. त्यांनी स्पष्टीकरण दिल्याने संभ्रम दूर झाला आहे. 

विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीने जयंत आसगावर यांना उमेदवारी देऊन माजी आमदार सावंत यांना मोठा धक्का दिला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या विजयासाठी कॉंग्रेसबरोबरच राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. तर भाजनेही शिक्षक मतदार संघातील निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. 

याच दरम्यान राज्य शाळा कृती समितीचे अपक्ष उमेदवार माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी काल सोलापूर येथे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या विचारांचा मतदार माझ्या सोबत असल्याचे विधान केले होते. सावंत यांच्या विधानामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गोठात खळबळ उडाली होती. 

सावंत यांनी केलेल्या या विधानाविषयी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांना विचारले असता त्यांनी, माजी आमदार सावंत यांच्याबरोबर राष्ट्रवादी विचाराचा कोणीही कार्यकर्ता किंवा शिक्षक जाणार नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठीच आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. 

शिवसेनेच्या नेत्यांनीही सावंत यांच्या विधानाचा आणि पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केल्याने अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांनी केलेला दाव अवघ्या काही तासांतच फोल ठरला आहे. 

भाजप पदाधिकाऱ्यांचा पंढरपुरात मेळावा 
दरम्यान, पंढरपुरात भाजपचे उमेदवार जितेंद्र पवार आणि संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ येथील श्रीराम मंगल कार्यालयात भाजप पदाधिकारी आणि शिक्षकांचा मेळावा पार पडला. यामध्ये भाजप आमदार प्रशांत परिचारक, सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आपले दोन्ही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांनी नेटाने काम सुरू करावे, अशा सूचना दिल्या. 

मेळाव्याला पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल