
केत्तूर (ता. करमाळा, जि. सोलापूर) : सध्या करमाळा तालुका आणि जिल्ह्यातून अरब देशांत दररोज सुमारे 50 ट्रक केळीची निर्यात होते. पश्चिम बंगाल येथून आलेल्या तीन हजार कुशल कामगारांवर निर्यात अवलंबून आहे. मात्र, लॉकडाउन पार्श्वभूमीवर सरकारने परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी दिल्याने यातील काही कामगारांना ईदपूर्वीच घराकडे जाण्याची ओढ लागली आहे. स्थानिक कामगारांना यापुढे कुशल होण्याची आवश्यकता आहे. अन्यथा केळी निर्यात अडचणीत येण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, माळशिरस तालुक्यांतील केळी निर्यातीला मागील चार वर्षांपासून गती आली आहे. तालुक्यात आणि जिल्ह्यात दर्जेदार आणि निर्यातक्षम उत्पादन होते. परंतु, कापणीनंतर केळीची हाताळणी करताना होणाऱ्या असंख्य चुकांमुळे निर्यातीत अडथळे निर्माण होतात. केळी कापल्यानंतर पॅकिंग करताना बाहेरून घासल्यास पिकल्यानंतर ती काळी होतात. विदेशात अशी केळी रिजेक्ट केली जातात. याकरिता अत्यंत काळजीपूर्वक आणि कौशल्याने हाताळणी करणाऱ्या बंगाली मजुरांना प्राधान्य दिले जाते. एक ट्रक म्हणजे सुमारे 10 टन केळी कापून भरण्यासाठी साधारण 15 बंगाली मजुरांचे एक पथक काम करते.
कौशल्यपूर्वक कामे
झाडावरून कापलेला केळीचा घड काळजीपूर्वक खांद्यावर नरम गादीवर ठेवून माल वाहतूक गाडीपर्यंत आणणे, केळीच्या खालची वाळलेली काळी फुलं काढून घडाच्या प्लास्टिक दोरीच्या साह्याने फण्या वेगवेगळ्या करणे, या फण्या आधी स्वच्छ पाण्याने आणि नंतर बुरशीनाशक पाण्याने धुणे, या फण्यांचे 13 किलो याप्रमाणे बॉक्समध्ये पॅकिंग करणे आणि शेवटी कागदी बॉक्समध्ये केळी ठेवलेल्या प्लास्टिकच्या पिशवीतील हवा काढून बॉक्स पॅक करणे आदी कामे कुशल मजूर उत्कृष्टपणे करताना दिसतात.
पॅकिंगचा खर्च मोठा
बंगाल येथील हे कुशल मजूर निर्यात केळी पॅकिंग कामाकरिता क्विंटलला 300 रुपये मजुरी घेतात. मजुरी काहीशी जास्त असली तरी त्यामागे त्यांची मेहनत, कष्ट आणि चिकाटी असते. विदेशात केळी पोचल्यानंतर पॅकिंगमध्ये दोष आढळल्यास मजुरांकडून पैसे वसूल करण्याची पद्धत असल्याने हे मजूर प्रामाणिकपणे काम करतात.
मजुरांना लागली घरची ओढ
सर्व मजूर पश्चिम बंगाल येथील मालदा शहर परिसरातील आहेत. यातील अनेक मजूर धर्माने मुस्लिम असून कोरोना भीतीने ईदपूर्वी घराकडे जाण्याची त्यांची इच्छा आहे. हे कामगार जानेवारीपासून किंवा त्याआधी केळी निर्यातीसाठी सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात येतात. जुलैपर्यंत ते काम करतात. वर्षांतील किमान सात महिने ते महाराष्ट्रात राहतात. सध्या करमाळा तालुक्यात कंदर व माढा तालुक्यांतील टेंभुर्णी येथे बंगाली कामगारांची अनेक पथके असून सुमारे तीन हजार कामगार आहेत. ईदपूर्वी निम्मे कामगार घरी गेल्यास निर्यातीचे प्रमाण कमी झालेले असेल. स्थानिक मजुरांची मदत केळी व्यापाऱ्यांना घ्यावी लागणार आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान
परप्रांतीय मजुरांची कामावरची निष्ठा वाखण्याजोगी आहे. ते मजूर काम प्रामाणिकपणे करत असल्याने देखरेख करण्याची गरज नसते. परंतु, सर्व मजूर आपल्या गावाकडे गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मजुरांना परत आणण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न होण्याची गरज आहे.
- रंगनाथ शिंदे, केळी निर्यातदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.