शैक्षणिक कर्ज वाटपात बॅंकांनी आखडला हात : का ते वाचा ही आहेत कारणे 

Education_Loan.jpg
Education_Loan.jpg

सोलापूर : शैक्षणिक कर्ज न फेडण्याची वृत्ती विद्यार्थी व पालकांमध्ये वाढल्याने कर्ज वाटपात बॅंकांनी सावध भूमिका घेतल्याने अनेक पालक कर्जांपासून वंचित राहात आहेत. पूर्वी कर्ज घेतलेले विद्यार्थी पुन्हा बॅंकांकडे न फिरकल्याने बॅंकांची थकीत कर्जे वाढत आहेत. तर दुसऱ्या बाजूला अनेक विद्यार्थी व पालक सध्या बॅंकांच्या दारात कर्जसाठी चकरा मारत आहेत. यामुळे होतकरू, गरीब, गरजवंत शिक्षणासाठी कर्जाची नितांत गरज असलेले विद्यार्थी मात्र कर्जापासून वंचित राहत आहेत. एकूणच हा सारा प्रकार पाहिल्यानंतर जुने फेडेनात... नव्यांना मिळेना अर्ज, असाच प्रकार समोर येत आहे. 

विद्यार्थ्यांना कर्ज मिळवण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी "विद्या लक्ष्मी' या नावाचे स्वतंत्र पोर्टल बनविण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून कर्ज वितरण करण्यात येते. ऑनालाइन पद्धतीने बॅंकेची निवड करता येते. ऑनलाइन पद्धतीनेच कर्ज वितरण होते. मात्र, बॅंकांचा अनुभव विशेषत: आयटी क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत अतिशय जोखमीचा झाला आहे. अनेक विद्यार्थी कर्ज घेतात. कर्ज घेताना 4 लाखापर्यंतचे कर्ज कोणत्याही तारणाशिवाय व जामिनदारांशिवाय दिले जाते, तर 7.5 लाखापर्यंत फक्त जामिनदाराची गरज असते. त्यापुढील कर्जासाठी जामिनदार व तारण असे दोन्हीही अवश्‍यक असते. यामुळे अनेक कर्जदार बॅंकाकडून घेतलेले कर्ज न फेडता थकीत ठेवत आहेत तर कित्येक कर्जदार विद्यार्थी हे कर्ज थकीत ठेवत परदेशी रवाना होत आहेत. याचा परिणाम नव्या कर्जदारांवर होऊन नवीन प्रकरणे कर्जमंजुरी करण्यास सर्वच बॅंकांनी हात आखडता घेतला आहे. यामुळे दुसऱ्या बाजूला विद्यार्थी व पालक कर्जासाठी बॅंकाची दारे झिजवत आहेत. 

अल्पसंख्यांकांना कमी व्याजदार 
मुस्लिम, ख्रिश्‍चन व जैन विद्यार्थ्यांना फक्त वार्षिक 3 टक्के व्याजदराने कर्ज मिळण्याची सुविधा मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाकडून करण्यात आली आहे. यासाठी 2.5 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणे बंधणकारक आहे. मालमत्ताधारक किंवा सरकारी नोकरदार जामिनदाराची आवश्‍यकता असते. या महामंडळाकडे येणारे जवळपास शंभरटक्के कर्जप्रकरणे मंजूर होतात. मात्र, काही मुलीच्या बाबतीतविवाहनंतर नोकरी करणे शक्‍य न झाल्याने थकीत कर्ज कोण फेडणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

परिसर मुलाखतीतून नोकरी; 
पण कर्ज मात्र थकीत 

आयटी क्षेत्रातील अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्जाचा लाभ घेतलेला आहे. नोकरी न लागल्याने कर्ज थकीत असेल तर स्वाभाविक आहे. मात्र, अनेक विद्यार्थी परिसर मुलाखतीतून नोकरी मिळवतात. नोकरीच्या जीवावर नवी कर्जेही मिळवतात. मात्र, शैक्षणिक कर्ज थकीत ठेवून परदेशी गेलेले किंवा देशातर्गंत हे कर्जदार विद्यार्थी नेमके कुठे स्थायिक झाले हे बॅंकांना माहित नसल्याने वसुली थकीत राहते. कर्जदार वाढत जात आहेत. 

ठळक बाबी 

  • चार लाखांपर्यंत विनातारण, विना जामिनदार कर्ज 
  • 7.5 लाखांपर्यंत तारणाशिवाय केवळ जामिदाराची आवश्‍यकता 
  • 7.5 लाखांपासून पुढे तारण व जामिनदार दोन्हीची गरज 
  • अल्पसंख्यांक महामंडळाकडे केवळ 3 टक्के दराने कर्ज 


यंदा कोरोनामुळे सध्या अनेक कॉलेजच्या प्रवेश प्रक्रिया झालेल्या नाहीत. अनेकांची अजून कॉलेज फिक्‍स झालेले नाही. यामुळे अनेक विद्यार्थ्यांची कर्ज प्रक्रिया प्रलंबित आहेत. कॉलेज फिक्‍स झाले. विद्यार्थ्यांनी कोटेशन दिले की, त्वरीत कर्ज वाटप केले जाईल. 
-प्रशांत श. नाशिककर, जिल्हा अग्रणी प्रबंधक 

आम्ही जवळपास सर्व प्रकरणे मंजूर करतो. कर्ज थकीत ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 50 ते 70 टक्के आहे. उर्वरित वसुली सुरू आहे. लोकांनी वेळेत कर्जफेड केली तर नव्या मागणीदारांचा समावेश करता येईल. 
-सी. ए. बिराजदार, जिल्हा व्यवस्थापक, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ 

संपादन : अरविंद मोटे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com