बार्शीत रेड्यांच्या मिरवणुकीवर कोरोनाचे सावट ! पशुपालकांनी हौसेला मुरड घालून केली घरातच पूजा 

प्रशांत काळे 
Wednesday, 18 November 2020

दिवाळीचा पाडवा म्हटलं की बार्शी शहरातील पांडे चौक ते नगरपालिका या मुख्य रस्त्यावर हलग्यांच्या कडकडाटात रेडे मिरवून पळवण्याची मोठी प्रथा वर्षानुवर्षे सुरू होती. पण यावर्षी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच मिरवणुकांवर बंदी घातल्याने हौशी पशुमालकांना आपल्या हौसेला मुरड घालून रेड्यांची पूजा घरीच करण्याची वेळ आली आहे. 

बार्शी (सोलापूर) : दिवाळीचा पाडवा म्हटलं की बार्शी शहरातील पांडे चौक ते नगरपालिका या मुख्य रस्त्यावर हलग्यांच्या कडकडाटात रेडे मिरवून पळवण्याची मोठी प्रथा वर्षानुवर्षे सुरू होती. पण यावर्षी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच मिरवणुकांवर बंदी घातल्याने हौशी पशुमालकांना आपल्या हौसेला मुरड घालून रेड्यांची पूजा घरीच करण्याची वेळ आली आहे. 

दिवाळी पाडवा अन्‌ भाऊबीज असे दोन दिवस परंपरेनुसार बार्शी शहर व तालुक्‍यातील पशुपालकांच्या आयुष्यातील आठवण ठेवणारे दिवस असून, या दिवशी रेड्यांच्या मिरवणुका बार्शीकरांसाठी विशेष आकर्षणाचा विषय असतो. शहर व तालुक्‍यातील बहुतांश पशुमालक आपापल्या रेड्यांना वर्षभर पशुखाद्य, चारा खाऊ घालून तयार करून टकरीसाठी सज्ज केलेले असत. 

रेड्यांची आकर्षक सजावट करून हलगी - ताशांच्या गजरात शहरात एक किलोमीटरपर्यंत पळवण्यात येऊन भव्य मिरवणूक काढली जात असे. त्यानंतर टकरीसाठी तीन ठिकाणी मैदाने असत. रेडे समोरासमोर भिडल्यानंतर रेडा पळून जात असताना अनेक वेळा अपघात झाले. 

समालोचन, सूत्रसंचालन करण्यासाठी उभा केलेला मंडप, लाकडी कट्टे, प्रेक्षकांचे फळ्यांचे बैठकीची आसने, रेड्यांनी धक्के दिल्याने कोसळल्याने अनेकजण जखमी झाले तर काहींना जीव गमवावा लागला होता. यामुळे रेड्यांच्या टकरींवर शासन, सर्वोच्च न्यायालयाने बंदी घालताच टकरी बंद झाल्या. आजही म्हशी, रेडे पळवण्याची दीर्घ अशी परंपरा शहरात आहे; पण कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे त्यालाही बंदी आल्याने पशुपालकांचा हिरमोड झाला आहे. 

दादा मारकड या हौशी पशु मालकांनी घरी दारातच रेड्यांची सजावट करून हलगी - ताशांच्या गजरात पूजा केली. या वेळी महालक्ष्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अण्णा पेठकर, विकास अलदर, पिंटू घोलप, उमेश पवार, दिनेश मस्के, हेमंत बाबर, सामाजिक कार्यकर्ते गणेश गाढवे, तुळशीदास मस्के, हरिभाऊ खांडेकर, पप्पू मस्के, आकाश लाकाळ आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banned the procession of Bull in Barshi due to Corona