
तुर्कपिंपरी (ता. बार्शी) येथील बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्रीजचे रणजितसिंह बबनराव शिंदे, कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक, बार्शी येथील बॅंक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी व अन्य एक जण यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. शेतकरी श्रीहरी श्रीपती शिंदे (रा. बाभूळगाव) यांनी याबाबत न्यायालयात फिर्याद दाखल केली होती.
बार्शी (सोलापूर) : बाभूळगाव (ता. बार्शी) येथील शेतकऱ्याच्या नावावर कागदपत्रे तयार करून त्यांच्या परस्पर बॅंकेकडून तीन लाख रुपये कर्ज काढल्याप्रकरणी बॅंक, साखर कारखाना अध्यक्ष, बॅंक शाखाधिकारी, व्यवस्थापकीय संचालकासह चार जणांवर गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश येथील प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी आर. एस. धडके यांनी बार्शी पोलिसांना दिले आहेत. रणजितसिंह शिंदे हे माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र असल्यामुळे राजकीय व सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
तुर्कपिंपरी (ता. बार्शी) येथील बबनराव शिंदे शुगर इंडस्ट्रीजचे रणजितसिंह बबनराव शिंदे, कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक, बार्शी येथील बॅंक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी व अन्य एक जण यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. शेतकरी श्रीहरी श्रीपती शिंदे (रा. बाभूळगाव) यांनी याबाबत न्यायालयात फिर्याद दाखल केली होती.
शहरातील ढगे मळा येथील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत श्रीहरी शिंदे यांच्या नावाने कागदपत्रे तयार करून बॅंक खाते उघडण्यात आले व तीन लाख रुपये कर्ज मंजूर करून शाखाधिकाऱ्यांनी 28 सप्टेंबर 2016 रोजी रणजितसिंह बबनराव शिंदे यांच्या बॅंक खात्यावर रक्कम वर्ग केली. कर्ज प्रकरणाबाबत श्रीहरी शिंदे यांना कोणतीही कल्पना नव्हती. बॅंकेने ऍड. योगीराज पुरवंत यांच्या मार्फत रक्कम व त्यावरील व्याज, अशी 3 लाख 93 हजार 203 रुपये भरण्याबाबत शिंदे यांना नोटीस पाठवली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.
कर्ज प्रकरणाबाबत श्रीहरी शिंदे यांनी रणजितसिंह शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता 18 फेब्रुवारी 2020 रोजी पत्र देऊन थकीत रक्कम आठ दिवसात भरण्याचे कबूल केले. मात्र अद्यापपर्यंत कर्जाची रक्कम भरलेली नाही. बॅंक कर्ज प्रकरणामुळे श्रीहरी शिंदे यांना दोन्ही मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी पैशाची आवश्यकता असताना आगळगाव येथील बॅंकेकडून कर्ज मिळाले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक, बार्शी शहर पोलिस यांच्याकडे फसवणुकीची तक्रार दाखल केली; पण पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही म्हणून न्यायालयात फिर्याद दाखल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. श्रीहरी शिंदे यांच्या वतीने ऍड. आर. यू. वैद्य, ऍड. के. पी. राऊत हे काम पाहात आहेत.
संपादन : श्रीनिवास दुध्याल