
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मार्चपासून राज्यात लॉकडाउन सुरू झाले अन् महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी प्रवासी बससेवा बंद करण्यात आली. आजही म्हणावे तेवढे प्रवासी बसमधून प्रवास करताना दिसत नाहीत. आगाराच्या उत्पन्नात घट झाली. बार्शी आगाराने जूनपासून बसमधून माल वाहतूक सुरू केली आणि सहा महिन्यांत 15 लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.
बार्शी (सोलापूर) : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मार्चपासून राज्यात लॉकडाउन सुरू झाले अन् महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी प्रवासी बससेवा बंद करण्यात आली. आजही म्हणावे तेवढे प्रवासी बसमधून प्रवास करताना दिसत नाहीत. आगाराच्या उत्पन्नात घट झाली. बार्शी आगाराने जूनपासून बसमधून माल वाहतूक सुरू केली आणि सहा महिन्यांत 15 लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.
एसटी बसमधील प्रवासी बैठक व्यवस्था काढण्यात येऊन चार बस माल वाहतूक करण्यासाठी तयार करण्यात आल्या. एका बसमधून 10 टन मालाची वाहतूक करण्यात येते. प्रवासी वाहतूक कमी असल्याने माल वाहतुकीकडे आगाराने लक्ष घातले आहे.
शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, डाळ मिलमधील डाळ यासह अन्य धान्यांची वाहतूक करण्यात येत असून सोलापूर, लातूर येथील बाजारपेठेसाठी जास्त फेऱ्या होत आहेत.
आगाराने आतापर्यंत जूनमध्ये 18 बसमधून 1 हजार 468 किलोमीटर अंतर प्रवास करून 63 हजार 380 रुपये, जुलैमध्ये 33 बसमधून 3 हजार 262 किलोमीटर अंतर प्रवास करून 98 हजार 575 रुपये, ऑगस्टमध्ये 41 बसमधून 3 हजार 322 किलोमीटर अंतर प्रवास करून 1 लाख 41 हजार 285 रुपये, सप्टेंबर 83 बसद्वारे 9 हजार 178 किमी अंतर प्रवास करून 3 लाख 65 हजार 320 रुपये, ऑक्टोबरमध्ये 126 बसद्वारे 11 हजार 559 किमी अंतर प्रवास करून 4 लाख 96 हजार 710 रुपये, नोव्हेंबरमध्ये 50 बसद्वारे 5 हजार 500 किमी अंतर प्रवास करून 2 लाख 51 हजार 220 रुपये असे एकूण 34 हजार 289 किलोमीटर अंतर प्रवास करून 14 लाख 16 हजार 500 रुपये उत्पन्न मिळवले आहे.
माल वाहतुकीस एका बससाठी दोन चालक असतात. मालाची तपासणी जयसिंग परदेशी, नितीन गावडे हे अधिकारी करतात तर माल वाहतूक निरीक्षक बाबासाहेब शिंदे प्रत्यक्ष माल बसमध्ये भरत असताना उपस्थित असतात.
हमाली व्यापारी भरतील, वाहतुकीसाठी वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू होणार नाही, माल पोच केला की तेथील व्यापाऱ्याने चार तासांत माल ताब्यात घ्यावा; अन्यथा तासाला 200 रुपये आकारण्यात येतील अशी बंधने महामंडळाची आहेत.
सुरक्षित व किफायतशीर माल वाहतूक करण्यात येत असून, महामंडळाची विश्वासार्हता आहे. राज्यात कोठेही माल वाहतूक करून माल पाठवला जातो. वेळेत माल मिळत असल्याने व्यापाऱ्यांचा एसटी बसकडे कल वाढला आहे. यापुढेही व्यापाऱ्यांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा प्रयत्न राहील.
- स्मिता मिसाळ,
आगार व्यवस्थापक तथा सहाय्यक वाहतूक अधीक्षक, बार्शी आगार
संपादन : श्रीनिवास दुध्याल