बार्शीत पारंपरिक प्रतिस्पर्धी आमदार राऊत व माजी मंत्री सोपल गटात रंगणार दुरंगी लढती ! मिरगणे, आंधळकर गटही सक्रिय 

Raut_Sopal
Raut_Sopal

बार्शी (सोलापूर) : तालुक्‍यातील 96 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यापैकी वैराग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी कोणीही अर्ज दाखल केला नसल्याने निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली गेली तर पानगाव ग्रामपंचायत निवडणूक तांत्रिक कारणामुळे रद्द झाली. 94 ग्रामपंचायतींच्या एकूण 798 सदस्य निवडीसाठी 1 हजार 287 उमेदवार रिंगणात आहेत. तालुक्‍यातील 16 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये विद्यमान आमदार राजेंद्र राऊत व माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यातच दुरंगी लढती होत असून, काही गावांत राजेंद्र मिरगणे, शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर यांच्या समर्थकांमुळे तिरंगी लढती होत आहेत. 

ग्रामपंचायतीच्या निवडणुका ग्रामीण राजकारणाला दिशा देतात. त्यामुळे ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी तालुक्‍याच्या सत्ता स्पर्धेतील राजकीय नेत्यांचे समर्थक हिरिरीने उतरले आहेत. सव्वा वर्षावर येऊन ठेपलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. 

बार्शी तालुक्‍यातील पंचायत समिती, नगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती ही सर्व सत्ताकेंद्रे आमदार राजेंद्र राऊत यांच्या ताब्यात आहेत. दीड वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ग्रामीण मतदारांचा कौल महत्त्वाचा ठरला होता. त्यामुळे राऊत समर्थक मोठ्या उत्साहात निवडणूक रिंगणात उतरले आहेत. माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या गटाला राजकारणातील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी सर्वस्व पणाला लावून लढावे लागणार आहे. या निवडणुकीनंतर नगरपरिषदेची निवडणूक होणार असून, त्या दृष्टीने जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर विजयी वाटचाल करावी लागणार आहे. 

तालुक्‍याच्या राजकारणात आपले स्थान निर्माण करण्यासाठी मिरगणे यांच्या समर्थकांनी धामणगाव, घोळवेवाडी, बाभळगाव, बावी, तडवळे (या), सावरगाव, काटेगाव या गावात काही ठिकाणी पॅनेल तर काही ठिकाणी स्थानिक आघाडीत शिरकाव केला आहे. प्रत्येक वेळी राजकीय गटांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक अतिशय ईर्षेने लढवली जाते. यंदाही सोपल व राऊत यांच्यातील चुरस कायम असल्याचे दिसत आहे. कोरोनामुळे ठप्प झालेल्या जनजीवनाचा व त्यानंतर अतिवृष्टी व अन्य कारणांचा या निवडणुकीवर काहीसा परिणाम झाल्याचे चित्र आहे. 

अर्थकारणामुळे ग्रामीण भागातील सूत्रधार ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुढे येतील, ही अपेक्षा होती; पण गत पंचवार्षिक प्रमाणेच बिनविरोधची संख्या 16 च्या पुढे जाऊ शकली नाही. उलट बिनविरोध निवडीची अर्धशतकी परंपरा असलेल्या मळेगावमध्ये निवडणूक होत आहे. विधायक पायंडा खंडित झाला. तुलनेने धोत्रे गावातील ग्रामस्थांनी माजी सैनिकांच्या हातात गावाचा कारभार सोपविण्याचा एकमुखाने घेतलेला निर्णय स्त्युत्य आहे. 

मतदानाला केवळ दोन दिवस उरले आहेत. मतदानोत्तर सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीनंतर ग्रामीण राजकारणाचे चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणुकीच्या प्रचार सभा मोठ्या प्रमाणात झाल्या नाहीत. शेतीची कामे सुरू असल्याने मतदार शेतात कामाला गेल्याने सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरापर्यंत उमेदवारांनी पदयात्रा काढून, प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन प्रचारावर भर दिला होता. 

बिनविरोध ग्रामपंचायती 
भोयरे, जामगाव (पा), खडकलगाव, मुंगशी (आर), पिंपळगाव (पा), जहानपूर, मालवंडी, शेलगाव (व्हळे), धामणगाव (आ), धोत्रे, हळदुगे, कापसी, खडकोणी, खामगाव, रातंजन, सर्जापूर अशा 16 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. 

वैराग, पांगरी, तालुका पोलिस ठाणे अंतर्गत 94 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, संवेदनशील गावांमध्ये पोलिसांनी संचलन केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com