जनतेनेच हाती घेतली कोरोनाविरुध्दची लढाई ! प्रभागात आता मृत्यू नाहीच; 26 रुग्णांवर सुरु आहेत उपचार

तात्या लांडगे
Saturday, 31 October 2020

ठळक बाबी...

  • प्रभागातील 631 व्यक्‍तींना आतापर्यंत झाली कोरोनाची बाधा
  • आतापर्यंत या प्रभागातील 583 रुग्णांनी केली कोरोनावर मात
  • कोरोनामुळे आतापर्यंत प्रभागातील 22 रुग्णांचा झाला मृत्यू
  • सद्यस्थितीत या प्रभागातील 26 रुग्णांवर सुरु आहेत रुग्णालयात उपचार
  • नागरिकांनीच हाती घेतली कोरोनाविरुध्दची लढाई

सोलापूर : शहरात कोरोनाचे आगमन झाल्यानंतर लोकांमध्ये समज-गैरसमज होते. गोरगरिब लोकवस्तीच्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. या प्रभागातील 22 जणांचा कोरोनाने बळी घेतला. तर प्रभागातील 631 व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी 583 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. प्रभागातील नागरिकांनी कोरोनाविरुध्दची लढाई हाती घेतल्याने आता या प्रभागातून कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होऊ लागला आहे.

प्रभाग पाचमध्ये झोपडपट्टीसह सुशिक्षितांची मोठी लोकवस्ती आहे. बाळे, वसंत विहार हे भाग वगळता मडके वस्तीसह अन्य भागातील नागरिक दाटीवाटीने राहतात. स्मार्ट सिटी असतानाही अस्वच्छतेचे साम्राज्य असलेल्या परिसरात नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, नगरसेविका ज्योती बमगोंडे, स्वाती आवळे यांनी घरोघरी जाऊन कोरोनाबद्दल माहिती दिली. घरपोच धान्य वाटप करताना नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले. त्यामुळे या प्रभागातील कोरोना आता हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. नागरिक आता कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची दक्षता घेत सोशल डिस्टन्सिंग पालन करतानाच मास्कचाही वापर करीत आहेत.

जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांनी केले नियमांचे पालन
प्रभागातील नागरिक कोरोनापासून दूर राहावेत, या हेतूने मडके वस्ती, वारद फार्म, गणेश नगर, कळके वस्ती, पांढरे वस्ती, गुलमोहर नगर, वसंत विहार या परिसरात औषध फवारणी केली. तर प्रभागातील गोरगरिबांना घरपोच धान्य वाटप केले. जनजागृतीच्या माध्यमातून लोकांनी नियमांचे पालन केल्याने आता प्रभागात रुग्णसंख्या कमी झाली आहे. 
- ज्योती बमगोंडे, नगरसेविका

13 हजार नागरिकांची आरोग्य तपासणी
फिवर ओपीडीतून प्रभागातील सुमारे 13 हजार नागरिकांची आरोग्य तपासणी केली. तर साबळे व बाळे नागरी आरोग्य केंद्रांतर्फे सुमारे तीन हजार नागरिकांची कोरोनासंबंधी रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट करुन घेतली. परंतु, आता नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन सुरु केले असून त्यांनीच कोरोनाविरुध्दची लढाई हाती घेतल्याने प्रभागातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. 
- आनंद चंदनशिवे, नगरसेवक

ठळक बाबी...

  • प्रभागातील 631 व्यक्‍तींना आतापर्यंत झाली कोरोनाची बाधा
  • आतापर्यंत या प्रभागातील 583 रुग्णांनी केली कोरोनावर मात
  • कोरोनामुळे आतापर्यंत प्रभागातील 22 रुग्णांचा झाला मृत्यू
  • सद्यस्थितीत या प्रभागातील 26 रुग्णांवर सुरु आहेत रुग्णालयात उपचार
  • नागरिकांनीच हाती घेतली कोरोनाविरुध्दची लढाई

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The battle against Corona was taken up by the people! There is no longer death in the ward; 26 patients are undergoing treatment