टेंभू योजनेच्या पाण्यावरून सोशल मीडियात श्रेयवादाची लढाई 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 June 2020

विविध ठिकाणी पाण्याचे पूजन 
टेंभूचे पाणी माण नदीत आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विविध ठिकाणी या पाण्याचे पूजनही होत आहे. मात्र सोशल मीडियाद्वारे विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याच नेत्याने या अगोदर पाण्यासाठी कसा प्रयत्न व संघर्ष केला आहे याच्या विविध पोस्ट पसरविल्या जात आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची पाण्यासाठी श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. 

सांगोला (सोलापूर) : टेंभू योजनेचे पाणी माण नदीत सोडल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, सोशल मीडियाद्वारे विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याच नेत्याने या अगोदर पाण्यासाठी कसा प्रयत्न व संघर्ष केला आहे, याच्या विविध पोस्ट पसरविल्या जात आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची पाण्यासाठी श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. 
माण नदीपात्रातील अकोला-वासूद (ता. सांगोला) येथे टेंभू योजनेच्या पाण्याचे पूजन नगराध्यक्षा राणी माने, आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबूराव गायकवाड, तालुकाध्यक्ष तानाजी पाटील, उद्योगपती भाऊसाहेब रूपनर, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक शिंदे, गुंडा खटकाळे, योगेश खटकाळे, अनिल खटकाळे, सरपंच अप्पासाहेब शिंदे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. 
या प्रसंगी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, ""प्रत्यक्ष कृष्णा आपल्या अंगणी आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, आटपाडीचे आमदार अनिल बाबर, टेंभूच्या सर्व अधिकाऱ्यांच्या सहकार्याने माण नदीत पाणी आले आहे. उन्हाळी आवर्तन आल्यामुळे याचा शेतीसाठी उपयोग होईल. हे पाणी बलवडी, वझरे, नाझरे, चिणके, वाटंबरे, वासूद-अकोला, कडलास, वाढेगाव, बामणी, सावे, मांजरी, देवळे, मेथवडेपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न असून तब्बल 400 क्‍युसेकने असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.'' माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील म्हणाले, ""बापू (शहाजीबापू पाटील) आपणास यापुढेही असे पाणी आणावे लागेल. शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी आपण काहीही करू, पण पाणी आणू. शेती सुजलाम-सुफलाम करू. पाण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The battle of Credit on social media over the waters of the Tembhu scheme