बेदाण्यासाठीचे डिपींग ऑइल महागले तीन हजारांनी 

संतोष सिरसट
रविवार, 5 एप्रिल 2020

आठ हजाराचे डिपींग ऑइल झाले 11 हजार रुपये 
लॉकडाऊनपूर्वी 50 लिटर डिपींग ऑइलसाठी आठ ते साडेआठ हजार रुपयांना मिळत होते. मात्र, आज ते घेण्यासाठी 11 हजार रुपये द्यावे लागतात. त्याचबरोबर पूर्वी 24 रुपये असलेल्या बॉक्‍सचा दर आता 32 ते 35 रुपये इतका झाला आहे. याकडे कृषी विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. 

सोलापूर ः लॉकडाऊनचा सर्वाधिक मोठा फटका राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. काढणीसाठी आलेली द्राक्ष व्यापारी नसल्याने शेतामध्येच आहे. त्यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीचा मार्ग धरला. मात्र, बेदाणा निर्मितीमध्येही शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात आहे. बेदाणा तयार करण्यासाठी लागणारे डिपींग ऑइल तब्बल तीन हजाराने तर बॉक्‍स 10-12 रुपयांनी महागले आहेत. या वस्तू उपलब्ध असूनही काळ्या बाजारासाठी त्याचा कृत्रिम तुटवडा केला जात आहे. 

सोलापूर जिल्ह्यासह राज्यात अद्यापही शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात द्राक्ष आहेत. त्यामुळे त्या द्राक्षाचे करायचे काय? असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. शेवटचा पर्याय म्हणून द्राक्षाचा बेदाणा तयार करण्याची मानसिकता शेतकऱ्यांची झाली आहे. बेदाणा करण्यासाठी द्राक्ष बुडविण्यास आवश्‍यक असलेले डिपींग ऑइलही मिळत नाही. केवळ डिपींग ऑइलच नव्हे तर बेदाणा भरडून झाल्यानंतर तो पॅक करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या बॉक्‍सचाही कृत्रिम तुटवडा केला जात आहे. त्यामुळे सगळ्याच बाजूने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी डिपींग ऑईलची मागणी डोंबिवली येथून करण्यात आल्याचे कृषी विभागाने सांगितले. डिपींग ऑइल व बॉक्‍सची उपलब्धता असूनही जाणूनबुजून त्याची कमतरता दाखविली जात आहे. हा काळाबाजार केवळ चढ्या दराने त्याची विक्री करण्यासाठी केला जात असल्याचे शेतकरी सांगतात. जिल्ह्यात बॉक्‍स उपलब्ध असूनही त्याचे बुकिंग करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला जात आहे. आज बॉक्‍सचे बुकिंग केल्यानंतर पाच-सहा दिवसांनी मालाचा पुरवठा केला जाईल, असे सांगितले जात आहे. बुकिंग करण्यासाठी संबंधितांच्या खात्यावर पैसा जमा करावे लागतात. पैसे जमा झाल्यानंतर पुढील पाच-सहा दिवसात बॉक्‍स मिळतील असे शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. डिपींग ऑइल व बॉक्‍सचा कृत्रीम तुटवडा पुरवठादारांकडून केला जात आहे. एकीकडे तुटवडा आहे म्हणून सांगायचे व दुसरीकडे त्या वस्तूची चढ्या भावाने विक्री करण्याची पद्धत सध्या सुरू झाली आहे. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For bedanas dipping oil cost increase of three thousand