esakal | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख नेते परिचारक, भालके, आवताडे प्रथमच एका व्यासपीठावर ! 

बोलून बातमी शोधा

Pdr_Bhalke_Paricharak}

बडवे समाज आणि संत प्रल्हाद महाराज प्रतिष्ठानच्या वतीने आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके आणि दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना योद्‌ध्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील हे प्रमुख तीन नेते प्रथमच एकत्र आले होते.

solapur
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख नेते परिचारक, भालके, आवताडे प्रथमच एका व्यासपीठावर ! 
sakal_logo
By
अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : बडवे समाज आणि संत प्रल्हाद महाराज प्रतिष्ठानच्या वतीने आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके आणि दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना योद्‌ध्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील हे प्रमुख तीन नेते प्रथमच एकत्र आले होते. 

व्यासपीठावर वारकरी पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राणा महाराज वासकर, विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी, प्रतिष्ठानचे अनिरुद्ध बडवे, अनंत बडवे, वैभव बडवे आदी उपस्थित होते. या वेळी मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्यासह सुमारे 72 योद्‌ध्यांचा सत्कार परिचारक, भालके आणि अवताडे यांच्या हस्ते करण्यात आला. 

या वेळी आमदार प्रशांत परिचारक म्हणाले, कोरोना महामारीच्या संकटाने माणुसकी शिकवली. कोरोना योद्‌ध्यांचा गौरव करण्यासाठी भालके - परिचारक आणि आवताडे यांना एकाच धाग्यात गुंफत राजकारणाच्या पलीकडे जाऊन "माणुसकीचा धागा' जोडता येतो, हे देखील या कार्यक्रमावरून दिसून आले. 

समाधान आवताडे म्हणाले, कोरोनामुळे झालेले नुकसान भरून येण्यासाठी आता अधिक उमेदीने आणि गतीने अर्थकारण आणि समाजजीवन प्रवाहित होण्याची गरज आहे. अशा सन्मानामुळे ही गती अधिक वाढेल . 

भगीरथ भालके म्हणाले, कोरोना हा एक आयुष्याला मिळालेला धडा होता आणि यातून समाज जीवनातील एकोपा किती गरजेचा आहे हे समोर आले आहे. 

विठ्ठल जोशी म्हणाले, कोरोनाचे संकट संपलेले नाही परंतु योद्धे आता विस्मृतीत जात आहेत. सातत्याने योद्‌ध्यांचे हे उपकार समाजासमोर ठेवण्यासाठी हे विसरू न देण्याची जबाबदारी या समाजाची आहे. या दृष्टीने असे सत्कार सोहळे सातत्याने आणि सदैव घडले पाहिजेत. 

अध्यक्षीय भाषणात ह. भ. प. वासकर यांनी सांगितले की, वारकरी संप्रदायाचे फार मोठे योगदान या महामारीच्या संकट निवारण्यासाठी झाले. देवाची आणि वारकऱ्यांची भेट टाळून विरहात्मक योगदान देखील वारकऱ्यांनी दिले. 

प्रास्ताविक अनिरुद्ध बडवे यांनी केले तर सूत्रसंचालन वैष्णवी बेणारे यांनी केले. आभार वैभव बडवे यांनी मानले. याप्रसंगी सुभाष बडवे, दर्शन बडवे, श्रीराम बडवे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

दिलीप धोत्रे यांच्या कार्याचा गौरव 
मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी विविध जाती-धर्माच्या गरजू लोकांना अन्नधान्याची मदत केली. केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात देखील त्यांनी ज्या-ज्या लोकांना मदतीची गरज आहे, अशा लोकांपर्यंत मदत पोचवण्याचे काम केले. त्याचा उल्लेख करून अनेकांनी श्री. धोत्रे यांच्या कार्याचा गौरव केला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल