महापालिका आयुक्‍तांचा मोठा निर्णय! दर रविवारी सुरु राहणार शहरातील दुकाने 

तात्या लांडगे
Saturday, 29 August 2020

ठळक बाबी... 

 • नागरिकांना लागली स्वंयशिस्त; ऍन्टीजेनसाठी नगरसेवकांचा पुढाकार ठरला फायदेशीर 
 • पोलिस प्रशासन अन्‌ महापालिका अधिकाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई 
 • शहरातील कोरोनाची स्थिती सुधारु लागली; टेस्टच्या तुलनेत रुग्णसंख्या झाली कमी 
 • 'मिशन बिगिन अगेन'अंतर्गत शहरातील दुकाने आठवडाभर राहणार सुरु 

सोलापूर : 'मिशन बिगिन अगेन'अंतर्गत शहरातील लॉकडाउन शिथिल करण्यात आला आहे. जनजीवन पूवर्वत झाले असून बाजारपेठांमध्ये गर्दीही वाढली आहे. तरीही महापालिका आणि पोलिस प्रशासनाच्या ठोस नियोजनामुळे शहरातील कोरोनाची स्थिती सुधारु लागली असून नागरिकांना स्वयंशिस्त लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता दर रविवारीही शहरातील बाजारपेठ पूर्ववत सुरु राहील, अशी माहिती उपायुक्‍त धनराज पांडे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. 

 

ठळक बाबी... 

 • नागरिकांना लागली स्वंयशिस्त; ऍन्टीजेनसाठी नगरसेवकांचा पुढाकार ठरला फायदेशीर 
 • पोलिस प्रशासन अन्‌ महापालिका अधिकाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई 
 • शहरातील कोरोनाची स्थिती सुधारु लागली; टेस्टच्या तुलनेत रुग्णसंख्या झाली कमी 
 • 'मिशन बिगिन अगेन'अंतर्गत शहरातील दुकाने आठवडाभर राहणार सुरु 

 

शहरातील कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर महापालिका आयुक्‍तांनी पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाउन केला होता. त्याचा चांगला परिणाम आता दिसू लागला आहे. आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यांनी, शिक्षकांनी घरोघरी जाऊन को-मॉर्बिड व्यक्‍तींचा सर्व्हेही केला. शहरात आतापर्यंत 30 हजारांहून अधिक ऍन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या असून त्यामध्ये सुमारे साडेअकराशे रुग्ण सापडले आहेत. त्याचाही परिणाम संसर्ग कमी होण्यासाठी झाला आहे. अद्याप ऍन्टीजेन टेस्ट सुरुच असून खासगी दवाखान्यांनाही महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी स्पष्ट निर्देश देत कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे तापसदृश्‍य रुग्णांना ऍन्टीजेन टेस्टसाठी पाठविले जात आहे. आता शहरातील रुग्णसंख्या आणि मृत्यूदर कमी झाला आहे. तत्पूर्वी, आयुक्‍तांनी रस्त्यांच्या दोन्ही बाजूच्या दुकानांसाठी ठरावीक दिवस दिला होता. मात्र, चेंबर ऑफ कॉमर्ससह आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे रविवार वगळता अन्य सहा दिवस दोन्ही बाजूची दुकाने सुरु राहतील आणि प्रत्येक रविवारी शहरातील सर्व दुकाने बंद राहतील, असे आदेश आयुक्‍तांनी काढले. त्यानंतर सणासुदीचे दिवस असल्याने रविवारी बाजारपेठ सुरु राहील, असा नवा आदेश पी. शिवशंकर यांनी काढला. आता तो आदेश यापुढे कायम करण्यात आला आहे. 


  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: Big decision of solapur Municipal Commissioner Shops in the city will continue every Sunday