
बिजवडी गावातील प्रभागात मनोज शिंदे यांचे तर तांबवे रस्त्यानजीकच्या (पवार वस्ती) प्रभागात अण्णासाहेब शिंदे यांचे वर्चस्व असल्याचे बोलले जाते. सत्ता मिळविण्यासाठी दोन्ही गटांची भिस्त तीन जागा असलेल्या रावबहादूर गटावरील प्रभागावरच अवलंबून आहे. दोन्ही गटांच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे.
माळीनगर (सोलापूर) : बिजवडी (ता. माळशिरस) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 7 जागांसाठी 14 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने येथे शिंदे - शिंदे गटात सत्तेसाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे. तीन प्रभागांतून सात सदस्य असलेली ही ग्रामपंचायत आहे. येथे 505 पुरुष व 452 स्त्री असे एकूण 957 मतदार आहेत. प्रभाग एकमध्ये तीन जागा असून 395 मतदार, प्रभाग दोन व तीनमध्ये प्रत्येकी दोन जागा असून अनुक्रमे 280 व 282 मतदार आहेत. मनोज शिंदे यांचा सहकार महर्षी विकास पॅनेल व अण्णासाहेब शिंदे यांच्या जनसेवा विकास पॅनेलमध्ये चुरशीच्या लढती येथे होत आहेत.
गेल्या पाच वर्षांत मनोज शिंदे यांच्या गटाची येथे सत्ता आहे. या ग्रामपंचायतीच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत मनोज शिंदे व अण्णासाहेब शिंदे गटास प्रत्येकी तीन जागा मिळाल्या होत्या. सातव्या निर्णायक जागेसाठी दोन्ही गटांच्या उमेदवारांना मतमोजणीत समसमान मते मिळाली होती. त्यामुळे या जागेचा फैसला चिट्ठीद्वारे झाला होता. त्यामध्ये नशिबाची साथ मिळाल्याने मनोज शिंदे गटाने चिट्ठीद्वारे सातवी जागा जिंकून बाजी मारत सत्ता काबीज केली होती. परिणामी त्याअगोदर 15 वर्षे सत्तेत असलेल्या अण्णासाहेब शिंदे गटास सत्ता गमवावी लागली होती.
बिजवडी गावातील प्रभागात मनोज शिंदे यांचे तर तांबवे रस्त्यानजीकच्या (पवार वस्ती) प्रभागात अण्णासाहेब शिंदे यांचे वर्चस्व असल्याचे बोलले जाते. सत्ता मिळविण्यासाठी दोन्ही गटांची भिस्त तीन जागा असलेल्या रावबहादूर गटावरील प्रभागावरच अवलंबून आहे. दोन्ही गटांच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यावर दोन्ही गट भर देत आहेत. मतदारांना खुश ठेवण्यासाठी भोजनावळी चालू असून त्यामुळे आसपासच्या ढाब्यांवर गर्दी होत आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल