मंगळवेढ्यातील जंगलगी परिसर बर्ड फ्लूचा अलर्ट झोन 

प्रमोद बोडके
Thursday, 14 January 2021

जंगलगी परिसरातील कोंबड्या विक्री, वाहतुकीस बंदी 
एखाद्या ठिकाणी कोंबड्या किंवा मृत पक्षी आढळून आल्यास मृत पक्षाच्या संपर्कात अन्य पक्षी व प्राणी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. जंगलगीपासून पाच किलोमिटर परिसरातील जिवंत वा मृत पक्षी, अंडी, कोंबडीखत, पक्षी खाद्य, अनुषंगिक साहित्य उपकरणे वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. जंगलगीच्या पाच किलोमीटर परिसरातील प्रभावित पक्षाच्या आजाराचा निदान अहवाल प्राप्त होईपर्यंत येथील पक्षांची खरेदी-विक्री दुकाने, वाहतूक बंद ठेवण्याचा आदेशही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला आहे. 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्‍यातील जंगलगी येथील पोल्ट्री फार्ममधील नऊ कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने या कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप येणे बाकी असून या पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लू सदृश्‍य रोगाने झाल्याचे निश्‍चित झाले आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून जंगलगीपासून दहा किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. 

सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबतचे आदेश आज काढले आहेत. राज्यात परभणी व लातूर या ठिकाणी बर्ड फ्लू दाखल झाल्यानंतर पोल्ट्री व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवेढा तालुक्‍यांमध्ये पशुसंवर्धन विभागाने सर्व पोल्ट्री फार्म परिसरातील कोंबड्यांची नियमित तपासणी करावी. कोंबड्यांचा मृत्यू आढळल्यास नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी, कुकुट पालकांनी मेलेल्या कोंबड्यांचा किंवा आजारी पक्षांची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना व नियंत्रण कक्षाला द्यावी, जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील क्षेत्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व पोल्ट्री फार्म तसेच परिसरातील कुक्कुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटी देऊन पक्षांची संख्या, पक्षांमधील मृत्यूची संख्या यांची माहिती घ्यावी, याबाबतचा सात दिवसांच्या कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्याचाही आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bird flu alert zone in the forested area of ​​Mars

टॉपिकस