बर्ड फ्लू..! सात पथकांद्वारे जंगलगी परिसरातील 756 पक्षी व 110 अंडी नष्ट; मारापुरातही प्रादुर्भाव?  

हुकूम मुलाणी 
Monday, 18 January 2021

पशुसवंर्धन विभागाच्या सात पथकाद्वारे पीपीई किट वापरून या कोंबड्या नष्ट करण्याचे काम सुरू केले; परंतु या परिसरातील कोंबड्या शेतकऱ्यांनी सकाळी सोडल्या होत्या. त्यासाठी संध्याकाळपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. 

मंगळवेढा (सोलापूर) : जंगलगीतील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी केली आहे. सात पथकांद्वारे रविवारी (ता. 17) प्रशासनाने एक किलोमीटर परिसरातील पोल्ट्री फार्ममधील 753 पक्षी व 110 अंडी रात्री उशिरापर्यंत नष्ट करण्यात आली. 

या वेळी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे, जिल्हा पशुधन उपायुक्त नानासाहेब सोनावणे, सहाय्यक पशुधन आयुक्त डॉ. प्रमोद बाबर, पशुधन विकास अधिकारी गोविंद राठोड, पशुधन अधिकारी ब्रह्मानंद कदम यांच्यासह मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस, सांगोला येथील पशुसवंर्धन विभागाच्या सात पथकाद्वारे पीपीई किट वापरून या कोंबड्या नष्ट करण्याचे काम सुरू केले; परंतु या परिसरातील कोंबड्या शेतकऱ्यांनी सकाळी सोडल्या होत्या. त्यासाठी संध्याकाळपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. मृत कोंबड्या पिशवीत भरून जेसीबीने खोदलेल्या खड्ड्यात पुरून टाकल्या. पशुसंवर्धन विभागाच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची टीम तयार करून या कोंबड्या नष्ट करण्याचे नियोजन करण्यात आले. 

प्रशासनाने तत्काळ या परिसरात एक किलोमीटर परिसरात असलेल्या कोंबड्यांचे सर्वेक्षण केले. बर्ड फ्लूचा प्रसार वाढू नये या दृष्टीने तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. जंगलगी येथील पोल्ट्रीतील कोंबड्या बर्ड फ्लूने मृत झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 10 किलोमीटरचा परिसर ऍलर्ट झोन जाहीर करत कोंबड्यांची वाहतूक, पक्षी खाद्य व अंड्यांची वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले. जंगलगी, सलगर बु, सलगर खु, आसबेवाडी, लवंगी, बावची, चिक्कलगी, शिवनगी ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून निश्‍चित करण्यात आली. बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली. यात तहसीलदार स्वप्नील रावडे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, पशुधन विकास अधिकारी गोविंद राठोड, पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, तालुका आरोग्य अधिकारी नंदकुमार शिंदे यांचा समावेश आहे. 

मारापुरातही प्रादुर्भाव? 
जंगलगी येथे सुरू झालेला बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आता मारापुरात पोचल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बर्ड फ्लूसदृश आजाराने येथील पाच शेतकऱ्यांच्या 17 कोंबड्या मृत झाल्या आहेत. त्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्या आहेत. त्याच्या अहवालानंतर पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The bird flu survey is being carried out by seven teams in the Jangalgi area