"बर्ड फ्लू'पासून "उजनी'तील पक्षी अद्याप तरी सुरक्षित ! शेडमधील कोंबड्यांचा संपर्क बाहेरील पक्ष्यांशी येऊ देऊ नका

राजाराम माने 
Saturday, 16 January 2021

बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर तालुक्‍यातील उजनी लाभक्षेत्रात सतर्कता मात्र पाळण्यात येत आहे. उजनी धरण लाभ क्षेत्रात पाहणी सुरू असून पशुसंवर्धन खात्यामार्फत जनजागृतीही करण्यात येत आहे. परंतु अद्यापपर्यंत तरी एकही पक्षी मृतावस्थेत आढळून आलेला नाही. 

केत्तूर (सोलापूर) : बर्ड फ्लूचे राज्यात आगमन झाले असून पोपट, बगळे, कावळे आदी पक्ष्यांबरोबरच कोंबड्याही मृत पावल्याच्या घटना समोर येत आहेत. असे असले तरी, देशी - विदेशी व स्थलांतरित पक्ष्यांचे "माहेरघर' असणाऱ्या उजनी जलाशय परिसरात मात्र अद्यापपर्यंत तरी एकही पक्षी बर्ड फ्लूने मरण पावल्याची घटना समोर आलेली नाही, ही उजनी जलाशयासाठी दिलासादायक व समाधानाची बाब म्हणावी लागेल. 

उजनी जलाशयावर दरवर्षी असंख्य देशी पक्ष्यांबरोबरच स्थलांतरित व विदेशी पक्षी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात. परंतु, यावर्षी वातावरणात सतत होणाऱ्या बदलामुळे अजूनही उजनी जलाशय तुडुंब भरलेले असतानाही जलाशयावर पक्ष्यांची संख्या मात्र कमी प्रमाणात आहे. त्याला कारण, जलाशयात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असल्याने जलाशयातील पाणवठे, पाणथळ जागा तसेच दलदलीच्या जागा अद्यापही पाण्याखालीच आहेत. तर गतवर्षी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने राज्यातील सर्व धरणे, तलावांमध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी साठा उपलब्ध आहे. 

बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर तालुक्‍यातील उजनी लाभक्षेत्रात सतर्कता मात्र पाळण्यात येत आहे. उजनी धरण लाभ क्षेत्रात पाहणी सुरू असून पशुसंवर्धन खात्यामार्फत जनजागृतीही करण्यात येत आहे. परंतु अद्यापपर्यंत तरी एकही पक्षी मृतावस्थेत आढळून आलेला नाही. 

करमाळा तालुक्‍यात उजनी धरण परिसरात तसेच जेथे पाण्याचे स्रोत आहेत तेथे व तालुक्‍यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांच्या कार्यक्षेत्रात येणारे पोल्ट्री फार्म यांची पाहणी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी होत आहे. तसेच ते येथील ग्रामस्थांच्या संपर्कातही आहेत. तालुक्‍यात त्वरित कार्य करण्यासाठी चार अतिदक्षता पथके तयार करण्यात आलेली आहेत. अद्यापपर्यंत तरी तालुक्‍यात कुठे मृत पक्षी आढळून आलेले नाहीत, तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये व नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्कात राहावे तसेच शासनाने वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून कुक्‍कुटपालन व्यवसाय करावा, असे तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीण शिंदे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. तसेच पोल्ट्री शेडमध्ये येणारे पक्षी हे लसीकरण होऊन येतात, त्यामुळे शेडच्या जाळीतून पक्षी बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. उजनी लाभक्षेत्रातील केत्तूर, वाशिंबे, उमरड येथील पशुवैद्यकीय अधिकारी याबाबत सतर्क असून त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. 

करमाळा तालुक्‍यातील कोंढार चिंचोली, कात्रज, डिकसळ, केत्तूर, गोयेगाव, वाशिंबे, सोगाव, कुगाव, टाकळी, कंदर, वांगी, कात्रज, चिकलठाण, गौळवाडी, खातगाव, पोमलवाडी, रामवाडी आदी तसेच इंदापूर तालुक्‍यातील डिकसळ, कुंभारगाव, पळसदेव, भादलवाडी, आगोती, गंगा वळण या उजनी लाभक्षेत्रातील गावांत पक्ष्यांचा किलबिलाट मात्र यावर्षी वाढला नाही, तर उजनीचे आकर्षण असणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचेही आगमन अद्यापही झालेले नाही. पाणी कमी झाल्यानंतर फ्लेमिंगो पक्षी उजनीची शान वाढवण्यासाठी निश्‍चितच येतील, अशी आशा पक्षी निरीक्षक व पक्षी अभ्यासकांना आहे. 

उजनीवर येणारे देशी-विदेशी पक्षी
फ्लेमिंगो, राजहंस, चक्रवाक, पट्टकदंब, नदीसुरयी, मासेमार घार, बदक, पाणकावळे, भोरड्या, समुद्री पक्षी, राखी बगळे, वकील पक्षी, पांढरे बगळे, ग्रेलॉक गुज, चित्रबलाक, स्मूनबुल, करकोचा, वटवट्या, चिखली, क्रोंच फ्लायकॅचर गार्डन, राव्होलर तुतवार, स्टेप ईगल आदी. 

परसातील कुक्कुटपालनासाठी हे करा 

  • आपल्या पोल्ट्रीमधील पक्ष्यांचा स्थलांतरित पक्ष्यांशी संपर्क टाळा 
  • पक्ष्यांच्या पाण्याची व खाद्याची भांडी दररोज स्वच्छ धुवा 
  • कोंबड्यांना खुराड्यात स्वच्छता ठेवा 
  • आपल्याकडील पक्षी आजारी पडल्यास किंवा असाधारण मरतुक आढळून आल्यास त्याची माहिती नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना द्या 
  • पूर्ण 30 मिनिटे शिजवलेले अंडे व चिकन मांस खाणे पूर्ण सुरक्षित 
  • कच्चे चिकन व मांस, अंडी खाऊ नका 
  • बर्ड फ्लू आजार पक्ष्यांपासून थेट माणसांना होण्याची शक्‍यता खूपच कमी आहे. 

यावर्षी उजनी धरण साठ्यात भरपूर पाणी असल्यामुळे पक्ष्यांना चराऊ भाग उपलब्ध नाही. त्यामुळे पाणलोट क्षेत्रात स्थलांतरित पक्ष्यांसह स्थानिक पक्ष्यांची वर्दळ तुलनेने कमी आहे. मात्र आगामी काही दिवसांत पाण्याचे विसर्ग होणार आहे; परिणामी पक्ष्यांची गर्दी होईल. त्या वेळी बर्ड फ्लूचा संसर्ग होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तरी परिसरातील नागरिक व पर्यटकांनी सावध बाळगून राहण्याची गरज आहे. 
- डॉ. अरविंद कुंभार, 
पक्षी अभ्यासक 

दरवर्षी उजनी जलाशयावर मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित पक्षी येतात. बर्ड फ्लूचे संकट घोंगावत असताना या रोगाची बाधा उजनी परिसरातील पक्ष्यांना झाली नाही, ही आनंदाची व दिलासादायक बाब म्हणावी लागेल. 
- कल्याणराव साळुंके, 
पक्षीप्रेमी, कुंभेज 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Birds in the Ujani reservoir area are still safe from bird flu