Breaking ! भाजपचे उपमहापौर राजेश काळे पक्षातून बडतर्फ 

तात्या लांडगे 
Wednesday, 13 January 2021

ठळक बाबी... 
- महापालिका उपायुक्‍त धनराज पांडे यांना उपमहापौर राजेश काळेंनी केली होती अर्वाच्य भाषेत शिवीगाळ 
- भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना पाठविला होता त्यांच्याविरुध्दचा अहवाल 
- पक्षीय बलाबलापेक्षा पक्षाने दिले पक्षशिस्तीला प्राधान्य; विक्रम देशमुख यांचे स्पष्टीकरण 
- उपमहापौर राजेश काळे यांचा खुलासा समाधानकारक नसल्याचेही दिसून आले 
- पक्षाचे सरचिटणीस शशिकांत थोरात काही वेळात जाहीर करणार निर्णय 

सोलापूर : उपमहापौर राजेश काळे यास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षातून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे. वारंवार पक्षातील पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारी आणि पक्षाची बिघडत चाललेली शिस्त आणि पक्ष हितास धोकादायक कृती केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

महापालिकेचे उपायुक्‍त धनराज पांडे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्यानंतर उपमहापौर राजेश काळेविरुध्द सदर बझार पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. सात- आठ दिवसानंतर पोलिसांनी सोलापूर- तुळजापूर रोडवरील श्री रुपाभवानी मंदिर परिसरात काळेला पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली होती. तत्पूर्वी, काळे यांच्याबद्दल सत्ताधारी नगरसेवकांनी अनेकदा शहराध्यक्षांकडे तक्रारी केल्या होत्या. दरम्यान, त्यांच्याविरुध्द यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांची कृती पक्ष हितासाठी धोकादायक असल्याने पक्षाने पक्षीय बलाबल पाहण्याऐवजी पक्ष शिस्तीला प्राधान्य दिल्याचेही देशमुख म्हणाले. महापालिकेत विरोधकांच्या तुलनेत सत्ताधारी भाजपचे पक्षीय बलाबल काठावर आहे. अशा परिस्थितीत पक्षश्रेष्ठींनी त्याचा विचार न करता शिस्तीला प्रधान्य देत हा निकाल दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

नवा उपमहापौर कोण? 
राजेश काळे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्याविरुध्द कारवाईचा अहवाल शहरातील पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठविला होता. काळे यांना पक्षाने बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता महापालिकेचा नवा उपमहापौर कोण, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. महापौर महिला असल्याने आगामी निवडणुकीच्या दृष्टीने नव्या, अनुभवी चेहऱ्याला उपमहापौरपदाची संधी दिली जाईल, अशी चर्चा आहे. त्यानुसार नागेश वल्याळ यांचे नाव आघाडीवर असल्याचीही चर्चा आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Deputy Mayor Rajesh Kale was removed from the BJP