Mahaswami
Mahaswami

बनावट जात प्रमाणपत्रावरून अडचणीत सापडलेले भाजप खासदार डॉ. महास्वामी म्हणाले, राजकारणापेक्षा मठच बरा होता ! 

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत बनावट जात प्रमाणपत्र वापरल्याप्रकरणी भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांची शहर पोलिसांनी बुधवारी दोन तास चौकशी केली. चौकशीमध्ये खासदारांनी काय जबाब दिला, हे समजू शकले नसले तरी, "का म्हणून राजकारणात पडलो? माझं धार्मिक कार्य बरं होतं, राजकारणापेक्षा मठच बरा होता', असे म्हणत डोक्‍याला हात लावल्याचे समजते. 

पोलिस आयुक्तालयात बुधवारी सकाळी दोन तास त्यांची गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांनी कसून चौकशी केली. मात्र चौकशीतून काय निष्पन्न झाले, हे अजून समजू शकले नाही. 

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये सोलापूर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित होता. खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी त्यांचा अनुसूचित जातीमधील दाखला बेडा जंगम असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. या प्रमाणपत्राला विनायक कंदकोरे, प्रकाश गायकवाड, मऱ्याप्पा मुळे यांनी हरकत घेतली होती. मात्र ही हरकत फेटाळण्यात आली होती. तेव्हा जयसिद्धेश्वर महास्वामी हे निवडून आले. याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड व मूळ तक्रारदारांनी सामाजिक न्याय विभागातील जात पडताळणी विभागाकडे तक्रार केली होती. जात पडताळणी समितीने चौकशी केली असता त्यात उमरगा आणि अक्कलकोट तहसील कार्यालयात बनावट नोंदी झाल्याचे निदर्शनास आले. 

जात पडताळणी समितीने तत्कालीन तहसीलदारांना जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे कळवले व त्याबद्दल तक्रार देण्याचे आदेश केले. तत्कालीन तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी याबाबत न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने ही तक्रार सदर बझार पोलिस ठाण्यात पाठवून त्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशावरून खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, अक्कलकोट आणि उमरगा येथील तहसील कार्यालयातील अज्ञात प्रशासकीय अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शिवसिद्ध बुळ्ळा यांच्यावर संशय बळावला आणि त्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. 

पुन्हा एकदा यावे लागेल चौकशीला 
भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा जातीचा दाखला बनावट असल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दाखला तयार करून दिल्याच्या संशयातून शिवसिद्ध बुळ्ळा याला यापूर्वीच अटक झाली आहे. पहिल्या टप्प्यात महास्वामी यांची प्राथमिक चौकशी गुन्हे शाखेने केली आहे. मात्र, काही प्रश्नांची उत्तरे स्पष्टपणे न मिळाल्याने गरज पडल्यास त्यांना पुन्हा एकदा चौकशीला बोलावले जाईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. चौकशी पूर्ण झाल्यानंतर चौकशी अहवाल न्यायालयात ठेवला जाणार आहे, असेही सांगण्यात आले. बुळ्ळा याने अनेकांना खोटे दाखले दिल्याचा संशय आहे, परंतु डॉ. महास्वामी यांच्यापुरताच गुन्हा असल्याने त्याअनुषंगाने तपास सुरू आहे, असेही सूत्रांनी या वेळी स्पष्ट केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com