भाजपचे खासदार महास्वामी काय म्हणालेत याचिकेत जाणून घ्या...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 February 2020

शिवाचार्य महास्वामी उर्फ नूरंदस्वामी गुरुबसय्या हिरेमठ यांनी लोकसभा निवडणुकीत बोगस जात प्रमाणपत्र दाखल केले, अशी तक्रार अपक्ष उमेदवार व माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांनी याचिकेद्वारे केली होती. या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने जात पडताळणी समितीकडे याबाबत दाद मागण्याचे निर्देश दिले आहेत.

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सोलापूर जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरुद्ध आता त्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, वंचितचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पराभव करून महास्वामी विजय झाले आहेत.
शिवाचार्य महास्वामी उर्फ नूरंदस्वामी गुरुबसय्या हिरेमठ यांनी लोकसभा निवडणुकीत बोगस जात प्रमाणपत्र दाखल केले, अशी तक्रार अपक्ष उमेदवार व माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांनी याचिकेद्वारे केली होती. या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने जात पडताळणी समितीकडे याबाबत दाद मागण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार समितीने पडताळणी केली असून नुकताच त्यांचा जातीचा दाखला रद्द केला आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे जातीचा दाखला नसल्याचा दावाही समितीने केला आहे. याबाबत वळसंग येथे महास्वामी यांनी पोलिस फिर्याद केली आहे. दरम्यान या प्रकरणात तक्रारदार यांनीही उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले असून बाजू ऐकून घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नका, अशी विनंती केली आहे. 

तहसीलदारांना याचिकेत प्रतिवादी

बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळाल्याचा दावा शिवाचार्य महास्वामी यांनी केला आहे. समितीने बाजू मांडायला पुरेसा अवधी दिला नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. समितीचा निर्णय रद्दबातल करावा आणि नव्याने जात प्रमाणपत्राची पडताळणी करावी, याबाबत तपासणी करावी, अशा मागण्या केल्या आहेत. तहसीलदारांना याचिकेत प्रतिवादी केले आहे. लवकरच नियमित न्यायालयात सुनावणी होणार आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MP Mahaswamy petitioned in the High Court