नवा पायंडा....! महापालिका अधिकाऱ्यांना बाहेर काढून सत्ताधाऱ्यांची बैठक

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

गटबाजी पुन्हा उफाळली
गत टर्ममध्ये दोन्ही देशमुखांच्या गटबाजीमध्ये अडीच वर्षे वाया गेली. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला मतदारांनी जागा दाखविल्यामुळे गटबाजी संपल्याचा दावा करण्यात आला. गटबाजी कायम राहिली तर महापालिकेतही महाविकास आघाडी अस्तित्वात येईल आणि सर्वाधिक नगरसेवक असतानाही विरोधात बसावे लागेल याची धास्ती वाटल्याने थोडे दिवस एकत्रित आल्याचा दिखावा करण्यात आला. पण मंगळवारी झालेल्या प्रकारामुळे महापालिकेतील भाजपमध्ये पुन्हा गटबाजी उफाळल्याची चर्चा रंगली आहे. 

सोलापूर : सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवरील प्रस्तावांबाबत चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या पार्टी मिटिंगच्या वेळी अधिकाऱ्यांना बाहेर काढून पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक घेण्याचा नवा पायंडा पडल्याचे आज सोलापूर महापालिकेत दिसून आले. 

महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता.20) आहे. या सभेच्या विषयपत्रिकेवरील प्रस्तावाबाबत चर्चा करण्यासाठी आज मंगळवारी दुपारी साडेचार वाजता बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीसाठी सर्व अधिकारी सभागृह नेते कार्यालयात जमले होते. मात्र काही प्रस्तावांवरून नगरसेवकांमध्ये मतभेद झाले. त्यामुळे या प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी बैठकीसाठी बसलेल्या अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर सभागृहात गरमागरम चर्चा सुरु झाली. 

पदाधिकारी व नगरसेवकांच्या चर्चेनंतर बैठकीत या अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्वच अधिकारी बाहेर ताटकळत उभे होते. पार्टी मिटिंगच्या वेळी असा प्रकार पहिल्यांदाच झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अर्थपूर्ण विषयांशी निगडीत काही प्रस्ताव असल्याने असा प्रकार झाल्याची चर्चा रंगली आहे. ही बातमी लिहीपर्यंत अधिकारी बाहेरच ताटकळत उभे होते. महाराष्ट्र 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp party meeting in solapur municipal corporation