मोहोळ मतदारसंघात सध्या जी कोल्हेकुई सुरू आहे, ती बंद करण्यासाठी फार वेळ लागणार नाही : धनंजय महाडिक

Mohol BJP
Mohol BJP

मोहोळ (सोलापूर) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधर हा मतदारसंघ तळहातावरील फोडाप्रमाणे जपला आहे, त्यामुळे या मतदारसंघात भाजप उमेदवाराचा विजय निश्‍चित आहे. दरम्यान, या तालुक्‍यात महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचाराला येणार नाही. तालुक्‍यातील राजकारणात नैवेद्य दाखविल्याशिवाय येथील देव बाहेरच पडत नाहीत. या मतदारसंघात सध्या जी कोल्हेकुई सुरू आहे, ती बंद करण्यासाठी फार वेळ लागणार नाही. इथून पुढील काळात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मी जातीने लक्ष घालणार आहे. जोपर्यंत मतदारसंघाचे आरक्षण संपत नाही, तोपर्यंत निवडणुकीला मजा येणार नाही, त्याची आम्ही सर्वजण वाटच पाहतोय, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केले. 

मोहोळ शहर येथे पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या प्रचार परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्या वेळी महाडिक हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, पदवीधर उमेदवार संग्राम देशमुख, शिक्षक उमेदवार जितेंद्र पवार, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भाजप नेते संतोष पाटील, सभापती विजयराज डोंगरे, विश्वराज महाडिक, शंकर वाघमारे, शशिकांत गावडे, तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, ब्रह्मदेव गोफणे, मोहन होनमाने, दशरथ काळे, दिलीप गायकवाड, संजय क्षीरसागर, सुशील क्षीरसागर, सतीश पाटील, महेश गावडे, दीपक गवळी, मुजीब मुजावर आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

या वेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख म्हणाले, हे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. आज कुठल्या तोंडाने पदवीधर असणाऱ्या सुशिक्षित मतदारांसमोर महाविकास आघाडी सरकार जाणार आहे, असा मला प्रश्न पडला आहे. हा मतदारसंघ भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे, त्यामुळे येथील मतदार कोणाचेही "लाड' करणार नाहीत. त्यामुळे या ठिकाणच्या उमेदवाराचा विजय निश्‍चित आहे. "माझे कुटुंब माझी जबाबदारी' अशी घोषणा करून सरकारने राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. 

अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे म्हणाले, तालुक्‍यात साडेतीन हजार मतदारांची नोंदणी झाली आहे. नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवून पदवीधर व शिक्षक दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांना तालुक्‍यातून मताधिक्‍य देऊन विजयी करू. 

या वेळी माजी मंत्री ढोबळे म्हणाले, सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रस्थापितांकडून हिसकावून घेऊन त्यावर भाजपचा झेंडा लावला, तर सांगली, मिरज, कुपवाड या महानगरपालिकांवरही भाजपची सत्ता आणली. अशा उमेदवाराला पक्षाने उमेदवारी दिली. त्यांना आपण सर्वांनी निवडून देऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करूया, असे आवाहन त्यांनी केले. 

संतोष पाटील, संजय क्षीरसागर, शंकर वाघमारे व दोन्ही उमेदवारांनी मनोगते व्यक्त केली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com