भाजप नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांची माढा लोकसभा जिल्हा संघटक सरचिटणीसपदी निवड 

शशिकांत कडबाने 
Friday, 29 January 2021

माढा लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक, पुणे पदवीधर निवडणुकीत व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत धैर्यशील मोहिते - पाटील यांची ठळक कामगिरी केली. याचीच दखल घेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. 

अकलूज (सोलापूर) : भाजप नेते धैर्यशील मोहिते- पाटील यांची प्रदेश नियुक्त माढा लोकसभा जिल्हा संघटक सरचिटणीस पदी व सोलापूर लोकसभा संघटक सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. 

सांगोला येथे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवरत्न शिक्षक संस्था व शिवामृतचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते- पाटील यांची प्रदेश नियुक्त माढा लोकसभा जिल्हा संघटक सरचिटणीसपदी निवड केली. या वेळी पश्‍चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, खासदार रणजितसिंह निंबाळकर, भाजप जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, आमदार प्रशांत परिचारक, आमदार राजा राऊत, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. 

गत लोकसभा निवडणुकीपूर्वी मोहिते - पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. मोहिते - पाटील यांच्या प्रवेशामुळे माढा मतदार संघात प्रथमच भाजपला लोकसभा निवडणुकीत यश मिळाले होते. या निवडणूकीत खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांना माळशिरस तालुक्‍यातून दीड लाखापेक्षा जास्त मताधिक्‍य मिळाले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजाप आमदार राम सातपुते यांना निवडून आणले होते. नुकत्याच झालेल्या माळशिरस तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अकलूजसह अनेक ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. 

माढा लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक, पुणे पदवीधर निवडणुकीत व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत धैर्यशील मोहिते - पाटील यांची ठळक कामगिरी केली. याचीच दखल घेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. या वेळी जिल्ह्यातील उपस्थित भाजप आमदार व पदाधिकाऱ्यांनी धैर्यशील मोहिते - पाटील यांचे अभिनंदन केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना अभिप्रेत असलेले संघटन बनविण्यासाठी सर्वांना एकत्र करून पक्षाची ध्येय - धोरणे व कार्यक्रम राबविताना सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष मजबुतीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे, असे धैर्यशील मोहिते - पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJPs Dhairyashil Mohite Patil elected as Madha Lok Sabha District Organizing General Secretary