
ठळक बाबी...
सोलापूर : राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. आगामी पाच ते सात दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक असल्याने युवासेना आणि विद्यार्थी कॉंग्रेसने आता सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. राज्यभर रक्तदार शिबिरांचे आयोजन केले असून 6 ते 11 डिसेंबरपर्यंत महारक्तदान शिबिरांचे नियोजन युवासेनेकडून करण्यात आले आहे. तर कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त 7 डिसेंबरला विद्यार्थी कॉंग्रसेने रक्तदान शिबिराचे नियोजन केले आहे.
ठळक बाबी...
कोरोनाची महामारी अद्याप संपलेली नसून दरवर्षीप्रमाणे यंदा रक्तदार शिबिरांचे आयोजन होऊ शकलेले नाही. गणेशोत्सव, नवरात्र यासह अन्य सण- उत्सव साधेपणाने साजरे करण्यात आले. महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीही कोरोनामुळे साधेपणानेच साजऱ्या करण्यात आल्या. त्यामुळे रक्तपेढ्यांमधील रक्त साठा कमी झाला आहे. रक्ताविना कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होऊ नये या हेतूने मुख्यमंत्र्यांनी रक्तदानाचे आवाहन केले. त्यानंतर युवासेना अध्यक्ष तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई, राज्य विस्तारक तथा सोलापुरचे संपर्कप्रमुख विपुल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे शहरप्रमुख विठ्ठल वानकर यांच्या पुढाकारातून सोलापुरात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर विद्यार्थी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कणबस (गं) येथे रक्तदान शिबिराचे नियोजन केले आहे. दक्षिण सोलापुरचे तालुकाध्यक्ष हरीष पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.