माळशिरस तालुक्‍यातील धाडसी नेतृत्व : शामराव पाटील 

दिनेश माने- देशमुख 
Tuesday, 15 September 2020

सर्वसामान्य, कष्टकरी शेतकरी सुध्दा प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर व जनतेच्या बळावर, विधानसभा निवडणुकीत बलाढ्य उमेदवारालाही चिटपट करून आमदार होऊ शकतो आणि तो विजयी आमदार कोण? अशी ज्यांची विचारणा देशपातळीवरील नेत्यांकडून केली गेली. तसेच माळशिरस तालुक्‍यात ज्यांच्या प्रेरणेने प्रस्तापितांच्या अन्यायाविरोधात लढण्याचे बळ जनतेला मिळते ते धाडसी नेतृत्व म्हणजेच माजी आमदार कै.शामराव (भाऊ) भीमराव पाटील होय. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला क्षेत्रात शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या माजी आ. शामराव (भाऊ) पाटील यांचे नुकतेच 6 ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. पितृपंधरवाड्यानिमित्त त्यांचे स्मरण... 

स्मरण 
माळशिरस तालुक्‍यातील जनतेलाही ज्या गावची ओळख नव्हती, अशा दुर्लक्षित पानीव गावात शामराव पाटील यांचा 20 डिसेंबर 1933 रोजी जन्म झाला. शेती आणि शेतीवर आधारित उत्पन्न हाच येथील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय आणि जगण्याचे साधन होते. येथील नागरिक शिक्षण, रस्ते, वीज, आरोग्य या मुलभूत गरजांपासून कोसो दूरच असल्याने साहजिकच त्यांना नोकरी, व्यापार, उद्योग याचा गंधही नव्हता. अशा परिस्थितीत शामरावभाऊंनी घराबाहेर पडून शिक्षणाला "वाघिणीचे दूध' समजून दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. या शिक्षणाचा त्यांनी आयुष्यातील पुढील राजकीय व सामाजिक लढाईत शस्त्र म्हणून उपयोग केला. गावचे सरपंच व विकास सेवा सोसायटीचे अध्यक्षपद सांभाळताना त्यांनी ग्रामस्थांचे व सभासदांचे सामाजिक व आर्थिक प्रगती उंचावण्याचे काम केले. अशाप्रकारे सर्व सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनातील अडीअडचणी सोडविण्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले. जनतेच्या कामासाठी अधिकार्यांना व नेत्यांना ते बेधडक भिडत असत. त्यामुळे थोड्याच काळात त्यांची लोकप्रियता वाढत गेली आणि भाऊ आमदार झाले. 

सन 1978 मध्ये झालेल्या माळशिरस विधानसभा निवडणुकीत सहकार क्षेत्रातील महामेरू व विजयाचे प्रबळ दावेदार असलेल्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या विरोधात लढण्याचे शामराव भाऊंनी धाडसी निर्णय घेतला. जनता पक्षाने त्यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर पाठिंबा दिला होता. संघर्षपूर्ण व अटीतटीच्या झालेल्या या लढतीत शंकरराव मोहिते पाटील यांचा धक्कादायक पराभव करून शामराव पाटील यांनी ऐतिहासिक कामगिरी केली. आपल्या कर्तृत्वावर आणि जनतेच्या पाठिंब्यावर सर्वसामान्य माणूस देखील आमदार होऊ शकतो, हे त्यांनी उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिले. हे शामराव पाटील पानीवकर कोण? असा प्रश्न महाराष्ट्रातील खेड्यापाड्यापासून दिल्लीपर्यंतच्या नेतेमंडळींत विचारला गेला. पुढे 1980 मध्ये त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ संपुष्टात आला. नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीतील कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशावरून उमेदवारी अर्ज दाखल केला असतानाही भाऊंना माघार घ्यावी लागली. परंतु 1978 च्या माळशिरस विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय समीकरण बदलत गेली. आमदार शामराव पाटील यांच्या धाडसी आणि बेधडक वृत्तीने त्यांची संजय गांधी, शंकरराव चव्हाण, बॅरिस्टर अंतुले, के.विद्याचरण शुक्‍ला, बुटासिंग, एन.के.पी.साळवे, माजी पंतप्रधान श्री. चंद्रशेखर, सुशीलकुमार शिंदे, राजारामबापू पाटील अशा नेत्यांशी त्यांचे राजकीय संबंध वाढत गेले. भाऊंच्या मनमिळाऊ व दिलदार स्वभावामुळे या सर्वांशी राजकीय संबंधाचे पुढे मैत्रीत रूपांतर झाले. रक्ताच्या नात्याइतकीच त्यांनी मैत्रीची नाती जपली.इस्लामपूरचे राजाराम बापू पाटील यांना शामरावभाऊ हे राजकीय गुरु मानत असत. त्यावेळी राजाराम बापूंनीही वाळवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. परंतु यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. तर शामरावभाऊ माळशिरस विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. शामराव भाऊ जेव्हा राजाराम बापूंना भेटायला गेले, तेव्हा तीस हजार जनसमुदाय असलेल्या सभेत राजाराम बापूंनी मी जरी निवडणूक हरलो असलो तरी माझा सिंह निवडून आला आहे असे सांगून स्वतः चा पराजय विसरून भाऊंना मिठीत घेतले होते. शिष्य असा जिज्ञासू असावा की, गुरूचे अंतःकरण ही उचंबळून यावे! याचीच प्रचिती या गुरु शिष्याच्या भेटीदरम्यान येणे साहजिकच होते. 

शामराव भाऊंना वैयक्तिक जीवनात चित्रपट पाहण्याचा छंद होता. असाच एक सिनेमा पाहताना सिनेमागृहाच्या मालकांकडून त्यांचा अपमान करण्यात आला. स्वतःचा स्वाभिमान जपनाऱ्या भाऊंना या अपमानाची सल स्वस्थ बसू देईना. यातूनच त्यांनी ध्येयपूर्ती साध्य करत श्रीराम सिनेमागृहाची अकलूज येथे उभारणी केली. 1972 साली बांधण्यात आलेले श्रीराम सिनेमागृह आजही देशातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे मोजक्‍या सिनेमागृहामध्ये गणले जात आहे. पुढे त्यांच्या मुलांनीही स्वकर्तृत्वाने या व्यवसायात प्रगती करत फिल्म डिस्ट्रिब्युशनमध्ये पाऊल टाकले आणि तो व्यवसाय त्यांनी वाढीस नेला. 

ग्रामीण भागातील गरीब व होतकरू मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत. याकरिता शामरावभाऊंनी पानीव येथे 1991 साली श्रीराम शिक्षण संस्थेची स्थापना केली. शिक्षणरूपी लावलेल्या बीजाचे आज वटवृक्षात रूपांतर झाल्याचे आपणास पाहवयास मिळते. या संस्थेच्या माध्यमातून एकाच छताखाली विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य, विज्ञान, तंत्रशिक्षण, अभियांत्रिकी, कृषी, औषधनिर्माण, संगणकशास्त्र अशा विविध विभागातून पदवी पर्यंतचे शिक्षण दिले जात आहे. 

मानवाच्या जीवनात सुख-दु:खाचे, यश-अपयशाचे, आशेचे- निराशेचे प्रसंग येत असतात. पण विचारांचा पाया भक्कम असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी असतात.याचा प्रत्यय भाऊंवर आलेल्या प्रसंगातून येतो. उद्योग व्यवसायात यशाची शिखरे गाठत असणाऱ्या विजय पाटील, जगदीश पाटील आणि राजेंद्र पाटील अशा एक विवाहित व दोन अविवाहित कर्त्या मुलांना वेगवेगळ्या अपघातात गमावण्याची वेळ त्यांच्यावर आली. संपूर्ण कुटुंबावर दु:खाचे पहाड कोसळले असताना संकटं टाळता येणं शक्‍य नाही परंतु दु:ख पचवून सर्वांना वटवृक्षासारखा आधार दिला पाहिजे. या विचाराने त्यांनी मोठ्या धैर्याने परिवाराला दु:खातून बाहेर काढले. यामध्ये त्यांना कुटुंबासाठी वेळ द्यावा लागला परिणामी राजकीय कामकाज थोडे थांबवावे लागले. 
शामराव भाऊंच्या राजकीय व सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा आजही त्यांच्या पुढील पिढीत जपला जात आहे. शामराव भाऊंनी स्थापन केलेल्या श्रीराम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी, युवक युवतींचा सर्वांगीण विकास करणाऱ्या शालेय शिक्षणाची गरज ओळखून प्रकाश पाटील व श्रीलेखा पाटील या दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण दिले जाते. तसेच डॉ. सुनिल पाटील व डॉ. अनुपमा पाटील हे दाम्पत्य देखील शामराव भाऊंच्या स्मृतीप्रित्यर्थ स्थापन केलेल्या अकलूज येथील शामराव पाटील मेडिकल कॉम्प्लेक्‍स च्या माध्यमातून कार्यरत आहेत. स्टार इमेंजिंग अँड रिसर्च सेंटरच्यावतीने अत्याधुनिक मशिनरीच्या आधारे रुग्णांच्या अचुक वैद्यकीय निदानाकरीता 3 टी.एम.आर.आय.,128 स्लाईस सी.टी.,डिजिटल मॅमोग्राफी, सोनोग्राफी अँण्ड कलर डॉपलर,डिजिटल एक्‍स-रे इत्यादींची सेवा पुणे, मुंबईच्या धर्तीवर देण्यात येत आहे.

सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला क्षेत्रात शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या माजी आ. शामराव (भाऊ) पाटील यांचे नुकतेच 6 ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. आणि सबंध तालुका एका धाडसी नेतृत्वाच्या कार्याला, सहवासाला पोरका झाला. त्यांचे पश्‍चात पत्नी सुमन (भाभी), सोलापूर जिल्हा कॉंग्रेस (आय) कमिटीचे व श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील व डॉ. सुनील पाटील अशी दोन मुले,अनुराधा देशमुख (अकलूज), सुरेखा पाटील (कराड), सुवर्णा पाटील (पुणे) या तीन मुली व सुनेत्रा पाटील , पानीवच्या सरपंच श्रीलेखा पाटील, डॉ.अनुपमा पाटील या सूना असा परिवार आहे. 

संपादन : अरविंद मोटे 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brave leadership in Malshiras taluka: Shamrao Patil