चोराला मानलं बुवा! कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्याच घरात चोरी; साडेचार लाखांचे दागिने चोरले

तात्या लांडगे
Saturday, 12 September 2020

साडेचार लाखांचे दागिने चोरले

 

घरातील सर्वांचेच रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भोसले यांना दिली. त्यानंतर कुटुंबातील सर्वांना उपचाराच्या निमित्ताने केगाव येथील सिंहगड कॉलेज येथील कोविड केअर सेंटर येथे हलविण्यात आले. तत्पूर्वी, त्यांनी घराचे दरवाजे, खिडक्‍या बंद करुन घराचे लोंखडी दरवाजाला कुलूप लावले होते. 11 सप्टेंबरला त्यांना घरी सोडण्यात आले. घरी आल्यानंतर दरवाजाचे कुलूप कोणीतरी तोडल्याचे दिसले.

सोलापूर : विजयपूर रोडवरील श्री समर्थ सोसायटीतील (एसआरपी ग्रूप न. दहा) शिवाजी शहाजी भोसले यांच्या घरातून चोरट्याने तब्बल चार लाख 50 हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले आहेत. भोसले यांच्या घरातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या घरातील सर्वजण पॉझिटिव्ह आल्याने त्यांना सिहंगड कॉलेजमधील कोविड केअर सेंटरमध्ये हलविले होते. या वेळी चोरट्याने हा डाव साधल्याचे पोलिस फिर्यादीत नमूद केले आहे.

 

फिर्यादी भोसले यांचे वडिल 15 दिवसांपासून आजारी असल्याने कुटुंबातील सदस्यांनी त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 4 सप्टेंबरला त्यांची कोविड टेस्ट करण्यात आली. त्यावेळी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे घरातील सर्वांचीच कोविड टेस्ट करण्यात आली. दरम्यान, घरातील सर्वांचेच रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भोसले यांना दिली. त्यानंतर कुटुंबातील सर्वांना उपचाराच्या निमित्ताने केगाव येथील सिंहगड कॉलेज येथील कोविड केअर सेंटर येथे हलविण्यात आले. तत्पूर्वी, त्यांनी घराचे दरवाजे, खिडक्‍या बंद करुन घराचे लोंखडी दरवाजाला कुलूप लावले होते. 11 सप्टेंबरला त्यांना घरी सोडण्यात आले. घरी आल्यानंतर दरवाजाचे कुलूप कोणीतरी तोडल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी घरात जावून पाहणी केली असता, घरातील साडेचार लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे समजले. भोसले यांनी तत्काळ विजापूर नाका पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तब्बल 15 तोळे सोने चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे करीत आहेत.

जुना विडी घरकुलात घरफोडी 
जुना विडी घरकुल परिसरातील अल्ली महाराज मठामागील श्रीकृष्ण वसाहतीत राहणारे पंकज चंद्रकांत वारकर हे 22 मार्च रोजी त्यांच्या वडिल व भावाची तब्बेत ठिक नसल्याने पुण्याला गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्याने त्यांच्या घरातून दोन गॅस सिलेंडर टाक्‍या आणि दागिने, असा एक लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. अनलॉकनंतर शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. फिर्यादी वारकर यांच्या घराशेजारी राहणाऱ्यांनी वारकर यांना दूरध्वनी करुन घराचे कुलूप उघडे असल्याची माहिती दिली. ही घटना 25 मार्चरोजी घडली होती, परंतु वारकर पुण्यात असल्याने त्यांनी पोलिसांत फिर्याद दिलेली नव्हती. दरम्यान, वारकर यांनी शुक्रवारी (ता. 11) एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली असून सहायक पोलिस निरीक्षक श्री. खांडेकर या घटनेचा तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Burglary in the home of a corona positive patient; Four and a half lakh jewelery was stolen