संस्थात्मक विलगीकरण केलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी; वाचा कुठे घडली घटना 

शशीकांत कडबाने 
Thursday, 23 July 2020

अकलूज व परिसरात कोरोनामूळे संस्थात्मक विलगीकरण केलेल्याच्या घरात चोरी होण्याची तिसरी घटना असून याचा तपास आणि कोरोनामुळे चौकाचौकात बंदोबस्त करणे, असे दुहेरी आव्हान पोलिसांपुढे आहे. 

अकलूज (सोलापूर) : कोरोनामुळे संस्थात्मक विलगीकरण केलेल्या माळीनगर येथील व्यक्तीच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे. 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माळीनगर येथील रमामाता कॉलनीत राहणारे महादेव नारायण बनसोडे यांचे संपुर्ण कुटूंब आनंदनगर येथील कोविड सेंटर येथे क्वारंटाइन करून ठेवण्यात आले आहे. मंगळवार (ता.21) रोजी मध्यरात्री घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरी चोरी केली आहे. याबाबत त्यांचे शेजारी विक्रम दयानंद वाघमारे यांनी महादेव बनसोडे यांचे अकलूज येथील भाचे कांतीलाल ठोकळे यांना चोरी झाल्याची मोबाईलवरून कल्पना दिली. कांतीलाल ठोकळे यांनी मामांशी संपर्क केला असता त्यांनी घरात रोख रक्कम व सोने असल्याचे सांगितले. परंतु नक्की किती मुद्देमाल गेला आहे हे घरातील व्यक्ती कोविड सेंटरमधून आल्यानंतरच समजणार आहे. चोरीबाबत कांतीलाल ठोकळे यांनी अकलूज पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 
अकलूज व परिसरात कोरोनामूळे संस्थात्मक विलगीकरण केलेल्याच्या घरात चोरी होण्याची तिसरी घटना असून याचा तपास आणि कोरोनामुळे चौकाचौकात बंदोबस्त करणे, असे दुहेरी आव्हान पोलिसांपुढे आहे. यापुर्वी संग्रामनगर येथील संस्थात्मक विलगीकरण केलेल्या कुटुंबाच्या घरातून रोख रक्कम व सोने चोरीस गेले आहे. त्यानंतर अकलूज शहरातील सील केलेल्या रूग्णालयातील ओषध दुकान फोडण्यात आले. आणि आता माळीनगर येथील संस्थात्मक अलगीकरण केलेल्याच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला आहे. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Burglary in an institutionally separated family home read where the incident took place