सांगोला शहरात दोन ठिकाणी घरफोडी; 6 लाख 65 हजार रुपयांची चोरी

दत्तात्रय खंडागळे 
Monday, 7 September 2020

सांगोला शहरातील दोन घरातील एक लाख 40 हजार रुपयांचे साडेतीन तोळे सोन्याची दागिने व पाच लाख 25 हजार रुपये रोख, असे एकूण 6 लाख 65 हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. 

सांगोला (सोलापूर) : घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून दोन घरातील एक लाख 40 हजार रुपयांचे साडेतीन तोळे सोन्याची दागिने व पाच लाख 25 हजार रुपये रोख, असे एकूण 6 लाख 65 हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना सांगोला येथील कर्मवीरनगर व वासुद रोड येथे 6 सप्टेंबर रात्री नऊ ते 7 सप्टेंबर सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. तसेच तीन दुकानांचे शटर उचकटुन चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी राहुल अशोक जाधव (रा. कडलास, ता. सांगोला) हे राहत असलेल्या मुरलीधर इमडे यांच्या भाड्याच्या घराच्या दरवाज्याची कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील राजाराणी लोखंडी कपाटातील लॉकर उचकटून त्यातील अडीच तोळे सोन्याचे दागिने व रोख पाच लाख रुपये असा एकूण सहा लाख रुपयांची रोख रक्कम व सोन्याची दागिने चोरून नेले आहेत. तसेच वासुद रोड येथील पाण्याच्या टाकी शेजारील कल्पना संभाजी सावंत यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने 25 हजार रुपये रोख रक्कम व एक तोळा सोन्याची चैन असा 65 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. दोन्ही घरातील एकूण सहा लाख 65 हजार रुपयाचा रोख रक्कम व सोन्याची दागिन्यांची चोरी झाली आहे. तसेच वासूद रोड येथील तीन दुकानांचे शटर उचकटून येथील काऊंटरचे ड्राव्हर तोडून चोरी करण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. या चोरीचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर करत आहेत. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Burglary at two places in Sangola city