तब्बल 98 बसच्या चेसी एकाच ठिकाणी क्रॅक ! एअरपोर्टवरील बस असण्याची शक्‍यता

Bus
Bus

सोलापूर : महापालिकेच्या परिवहन उपक्रमाकडील जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या बसपैकी 98 बसची चेसी एकाच ठिकाणी क्रॅक झाल्याने या बस तयार करणाऱ्या कंपनीकडूनच मॅन्युफॅक्‍चरिंग डिफेक्‍ट झाला का, असा प्रश्‍न उभा राहतो. विमानतळावर प्रवासी वाहतूक करण्यासाठी ज्या पद्धतीने बस तयार करण्यात येतात, तशा प्रकारच्या या बस असल्याचे सांगण्यात आले. 

महापालिकेच्या परिवहन उपक्रमात 2014-15 या कालावधीत केंद्र शासनाच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत 190 बस मंजूर झाल्या होत्या. त्यापैकी 144 बस खरेदी करण्यात आल्या. खरेदी करण्यात आलेल्या बसपैकी 98 बसच्या चेसी क्रॅक झाल्यामुळे या बसचे रजिस्ट्रेशन रद्द करून त्या भंगारात काढण्यात आल्या आहेत. चेसी क्रॅक बस दिल्याने महापालिकेने बसच्या कंपनीविरोधात लवादामध्ये दाद मागितली. परंतु, कंपनीच्या कारणांपुढे महापालिकेचे काहीही चालले नाही. त्यामुळे लवादाने महापालिकेच्या विरोधात निर्णय दिला. या निर्णयाविरोधात महापालिकेने जिल्हा न्यायालयात अपिल दाखल केले आहे. 

महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या बस या शहराची व्यवस्था व मर्यादा याचा कसलाही अभ्यास न करता इंजिनिअरिंग कॉलेजकडून तयार करण्यात आलेल्या प्रोजेक्‍ट रिपोर्टनुसार घेण्यात आल्या. डीपीआरच चुकीचा करण्यात आला. तांत्रिकदृष्ट्या कसलीही तपासणी न करता निकृष्ट दर्जाच्या बस खरेदी करण्यात आल्या. कंपनीबरोबर करण्यात आलेल्या करारामध्ये चेसी क्रॅक झाल्यानंतर ती गाडी पूर्णपणे बदलून देण्याचा नियम घालण्यात आला नव्हता. खरेदी करण्यात आलेल्या बसचा ग्राऊंड क्‍लिअरन्स खूपच कमी आहे, चेसीची लांबी जास्त असल्याने ती ताकदवान असायला पाहिजे होती; मात्र ती तशी नाही. बसची बॉडी जास्त वजनाची असल्याने हेलकावे घेते. वजनाचा बिंदू ज्या ठिकाणी समावेश होतो, तेथेच ताकद असायला पाहिजे, तिथेच ताकद नसल्याने चेसी क्रॅक झाल्या. 

याबाबतचा अहवाल तत्कालीन परिवहन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांनी राज्य शासनाकडे पाठविला होता. मात्र, त्या अहवालाचे पुढे काय झाले, याबाबत कसलीही माहिती मिळत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून सोलापूरच्या रस्त्यावर बस धावत नसल्यामुळे प्रवाशांसमोर मोठा प्रश्‍न उभा ठाकला आहे. 

ठळक बाबी 

  • बस निकृष्ट दर्जाच्या 
  • तांत्रिकदृष्ट्या तपासणी केली नाही 
  • कंपनीने ज्या प्रकारचे मॉडेल दाखविले, त्या पद्धतीची बस आहे की नाही, याची तपासणी केली नाही 
  • गाडी रिप्लेस करून देण्याबाबतची अट करारात घातली नाही 
  • ग्राऊंड क्‍लिअरन्स कमी 
  • थर्ड पाटी इन्स्पेक्‍शन केले नाही 
  • चांगल्या रस्त्याच्या मार्गावर चालणाऱ्या बसचीही चेसी क्रॅक 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com