ज्यांच्या मतांवर निवडून आले त्यांच्यासाठी चंद्रकांत पाटलांनी काहीही केले नाही : उमेश पाटील 

Akt Prachar
Akt Prachar

अक्कलकोट (सोलापूर) : आपले प्रश्न सोडविण्यासाठी पदवीधर व शिक्षकांनी सत्ताधारी पक्षाबरोबर जाणे गरजेचे आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे पदवीधरांच्या मतावर निवडून येऊन महत्त्वाच्या खात्याचे मंत्री झाले होते; मात्र त्यांनी बेरोजगारांसाठी व पदवीधरांसाठी काहीही केले नाही, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी केली. 

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अक्कलकोट येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे होते. मेळाव्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा शलाका पाटील, कॉंग्रेसचे युवक नेते प्रथमेश शंकर म्हेत्रे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय देशमुख, शहरप्रमुख योगेश पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, शहराध्यक्ष मनोज निकम, कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण जाधव, मंगल पाटील, वर्षा चव्हाण, माया जाधव, वैशाली हावनूर, सुनीता हडलगी, भीमा कापसे, माणिक बिराजदार, जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील आदी उपस्थित होते. 

उमेश पाटील पुढे म्हणाले, भाजप हा मित्रपक्षांना संपवणारा पक्ष असून, भाजपपासून मतदारांनी सावध राहावे. शरद पवार यांच्यामुळे शिक्षक व पदवीधर यांना चांगले दिवस आले असून, अक्कलकोट तालुक्‍यातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सर्वांत जास्त मतदान व्हावे. सर्वांत जास्त मतदान म्हणजे आगामी येणाऱ्या सर्व निवडणुकांत महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल. 

अध्यक्षीय भाषणात माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले, पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाराष्ट्रातील सर्व जागा जिंकल्यास देशात एक चांगला संदेश जाईल. त्यासाठी महाविकास आघाडीची ताकद आपण सर्वांनी दाखवावी व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतदान करून निवडून आणावे. 

या वेळी शलाका पाटील, संजय देशमुख, वर्षा चव्हाण, अरुण जाधव यांनीही मार्गदर्शन केले. 

मेळाव्यास श्रीशैल चितली, विक्रांत पिसे, शिव स्वामी, राम जाधव, विपुल दोशी, स्वामी पोतदार, श्रीनिवास सिंदगीकर, लक्ष्मण चिलगिरे, गणेश कांबळे, नवनीत राठोड, शंकर पाटील आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आमदार रोहित पवारांनी केली कार्यकर्त्यांना भेटून नाराजी दूर 
सर्वांचे आकर्षण असलेले व अक्कलकोट शहरात प्रथमच येत असलेले युवक नेते आमदार रोहित पवार हे शेवटपर्यंत मेळाव्यास येऊ शकले नाहीत. कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी उमेश पाटील यांनी गुरुवारी रात्री 9.30 वाजता मोबाईलवरून संपर्क साधून मोबाईल माईकवर लावून आमदार रोहित पवार यांचे भाषण ऐकवण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदार रोहित पवार हे सोलापूर येथे पत्रकार परिषदेत असल्यामुळे त्यांचे भाषण होऊ शकले नाही. मात्र शुक्रवारी सकाळी आमदार रोहित पवार यांनी अक्कलकोटला येऊन कार्यकर्त्यांना भेटून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com