माळशिरस तालुक्‍यात नेतृत्व देण्याची क्षमता : संग्राम देशमुख 

सुनील राऊत 
Thursday, 19 November 2020

नेतृत्व देण्याची क्षमता माळशिरस तालुक्‍यात असून, तालुक्‍यातील मतदारांनी मला संधी द्यावी, पदवीधरांच्या प्रत्येक हाकेला मी उपस्थित राहीन, अशी ग्वाही पुणे पदवीधर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांनी दिली. 

नातेपुते (सोलापूर) : नेतृत्व देण्याची क्षमता माळशिरस तालुक्‍यात असून, तालुक्‍यातील मतदारांनी मला संधी द्यावी, पदवीधरांच्या प्रत्येक हाकेला मी उपस्थित राहीन, अशी ग्वाही पुणे पदवीधर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांनी दिली. 

माळशिरस तालुका भाजपच्या वतीने पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे शिक्षक मतदार संघाच्या भाजपच्या उमेदवारांच्या तालुक्‍यातील प्रचाराचा प्रारंभ उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते अकलूज येथे करण्यात आला. या वेळी आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील, पुणे पदवीधर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख, शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जितेंद्र पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, बाबाराजे देशमुख, मदनसिंह मोहिते - पाटील, मामासाहेब पांढरे, भाजप ओबीसी युवती आघाडी पमुख डॉ. पूनम राऊत, रणवीर देशमुख, ऍड. प्रकाश पाटील, तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर, सोपानराव नारनवर, बाळासाहेब सरगर, अर्जुनसिंह मोहिते - पाटील ,संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक मोरे, प्रवीण काळे, भानुदास राऊत, जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्यासह विविध संस्थांचे व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

या वेळी आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील यांनी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस व पक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मतदान करावे, असे आवाहन केले. 

या वेळी शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जितेंद्र पवार यांनी, शिक्षक मतदार संघात कोणीही उमेदवार होऊ शकत असल्याने शैक्षणिक क्षेत्रातील काहीही माहिती नसलेले उमेदवार उभे राहिले असून, मतदारांनी ज्यांना शिक्षण क्षेत्रातील समस्यांचा अनुभव आहे, विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे प्रश्न माहीत आहेत अशा उमेदवारास निवडून देऊन द्यावे. शिक्षक हे पदवीधर व शिक्षक या दोन्हीकडे मतदान करू शकतात. तरी सर्वांनी दोन्ही भाजपच्या उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन केले. 

तालुकाध्यक्ष बाजीराव काटकर यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब सलगर यांनी आभार मानले. हरिभाऊ मगर यांनी सूत्रसंचालन केले. 

पदवीधर मतदार 

  • 4 लाख 26 हजार मतदारांपैकी 53 हजार सोलापूर जिल्ह्यात तर 4800 मतदार माळशिरस तालुक्‍यात आहेत 
  • 1200 शिक्षक मतदार आहेत.

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Campaign meeting of Sangram Deshmukh candidate of Pune Graduate Constituency at Natepute