तीन मतदार, दिमतीला सहा गाड्या अन्‌ 50 पोरं, तरीही सर्वांच्याच जीवाला घोर ! 

Nete
Nete

सोलापूर : ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी नुकतीच संपली! या निवडणुकीत काही ठिकाणी एक किंवा चार मतांनी उमेदवाराचा पराभव झाल्याची उदाहरणे आहेत. मुळात या निवडणुकीत मोजकेच मतदार असल्याने सर्वाधिक मते घेण्यासाठी उमेदवार वेगवेगळे प्रयत्न करतात अन्‌ यात नेहमीच परगावी गेलेल्या मतदारांची मते निर्णायक ठरतात. म्हणून "ती' मते आणण्यावर भर दिला जातो. यातूनच करमाळा तालुक्‍यातील बिटरगाव (श्री) मध्ये पुण्यातून तीन मतदार आणले होते. त्यांची मते आपल्यालाच मिळावीत म्हणून दोन्ही गटांनी फिल्डिंग लावली होती. 

करमाळ्याच्या पुढे जाऊन त्यांना आणण्यासाठी कार्यकर्ते गेले होते. त्यांच्या पुढे दोन गाड्या अन्‌ मागे दोन गाड्या तसेच त्यांच्या रिक्षाबरोबर दोन गाड्या अशा लवाजम्यात तीन मतदारांना गावाच्या फाट्यावर आणले होते. तिथे वाद होऊ नये म्हणून दोन्ही गटांची सुमारे 50 पोरं उपस्थित होती. यातून खरंच मतदार "राजा' असल्याचे दर्शन घडले. 

बिटरगाव (श्री) ग्रामपंचायतीच्या सात जागांची निवडणूक लागली होती. त्यात दोन जागा बिनविरोध निघाल्या होत्या. पाच जागांसाठी तीन प्रभागांतून 11 उमेदवार रिंगणात होते. त्यातही शेवटच्या क्षणी एका उमेदवाराने जय हनुमान ग्रामविकास पॅनेलला पाठिंबा दिला होता. तर जय तुळजाभवानी पॅनेलकडून पाच सदस्य रिंगणात होते. 

प्रचार सुरू झाल्यापासूनच प्रभाग दोनमध्ये बाहेरगावचे मतदान निर्णायक ठरणार, हे चित्र स्पष्ट होते. त्यामुळे दोन्हीही गटांकडून रणनीती आखली जात होती. या गावातून पोट भरण्यासाठी पुण्यात अनेक नागरिक गेले आहेत. त्यापैकी सुमारे 25 मतदार हे हडपसर येथे राहतात. त्यांना मतदानासाठी बोलावण्यात आले होते. त्यातील एक कुटुंब पुण्यातून रिक्षाने मतदानाला आले. त्यात तीन मतदारांचा समावेश होता. पुण्यातून निघाल्यापासूनच दोन्ही गटांचे कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात होते. त्यांना गावात आणण्यासाठी दोन्ही गटांचे कार्यकर्ते वीट गावाजवळ म्हणजे बिटरगाव (श्री) पासून 20 किलोमीटरवर गेले होते. एक मोटारसायकल गेल्याचे समजल्यानंतर दुसऱ्या गटाची कार त्यांना घेण्यासाठी गेली. कार गेल्याचे समजताच दुसऱ्या गटानेही तिकडे कार पाठवली. परगावचे मतदार आपल्या गाडीत यावेत यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, मतदारांनी कोणाच्याच गाडीत बसण्यास नकार दिला. 

करमाळ्यापासून त्यांना गावात आणण्यासाठी रिक्षाच्या पुढे दोन आणि रिक्षाच्या मागे दोन गाड्या झाल्या. रिक्षाच्या बाजूनेही मोटारसायकली असा सुमारे 12 किलोमीटरपासून मोठ्या लवाजम्यात आणण्णात आले. बिटरगाव (श्री) फाट्यावर आल्यानंतर दोन्ही गटांचे सुमारे 50 तरुण कार्यकर्ते एकत्र आले. तिथे दोन्ही गटांत किरकोळ बाचाबाची झाल्यानंतर मतदार असलेल्या रिक्षा चालकाने आपला मोर्चा तिथूनच माघारी फिरवला. मात्र, दोन्ही गटांनी पुन्हा एकमत करत "त्यांना ज्याला मतदान करायचे आहे त्याला मतदान करून द्यावे' असं ठरवण्यात आलं. 

केवळ तीन मतांसाठी करमाळा तालुक्‍यातील बिटरगाव (श्री) मध्ये उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना मतदारांची सरबराई करत मतदान आपल्याच पारड्यात पाडून घेण्यासाठी जंग-जंग पछाडावे लागल्याचे दिसून आले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com