"ताई, दादा, मामा गावाकडे कधी येणार?' कोरोनाकाळात परगावच्या मतदारांना गावबंदी, आता उमेदवारांचे आवतण !

राजाराम माने 
Saturday, 2 January 2021

नोकरीनिमित्त पोट भरण्यासाठी गावाकडून शहराकडे गेलेली मंडळी कोरोना प्रादुर्भावाच्या सुरवातीच्या काळात गावाकडे आल्यानंतर त्यांना गावबंदी करण्यात आली होती. आता ग्रामपंचायत निवडणूक लागल्याबरोबर गाव पुढाऱ्यांना व गावकऱ्यांना त्यांची आठवण झाली असून, "ताई, माई, अक्का, वहिनी, दादा, भाऊ, अण्णा, आबा, मामा गावाकडे कधी येणार? या वेळेस तरी गावी यावंच लागेल, जाण्या- येण्याच्या खर्चाबरोबरच इतरही बंदोबस्त केला जाईल' असेही सांगितले जात आहे. 

केत्तूर (सोलापूर) : एखाद-दुसरा अपवाद वगळता करमाळा तालुक्‍यातील ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा पार "बोऱ्या' वाजल्याचे सध्या तरी दिसत आहे. सध्या होणाऱ्या निवडणुका या चुरशीने व अटीतटीने होणार असल्याचे संकेत मिळत असल्याने मतदारांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भावाच्या सुरवातीच्या काळात कामधंद्याच्या निमित्ताने किंवा नोकरीनिमित्त पोट भरण्यासाठी गावाकडून शहराकडे गेलेली मंडळी "गड्या आपुला गाव बरा' असे समजून गावाकडे आल्यानंतर मात्र त्यांना गावबंदी किंवा त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त करण्यात येऊन त्यांना गावाकडे येण्यास विरोध केला जात होता. त्यामुळे बहुतांश जणांनी गावाकडे येण्याचेही टाळले होते. ग्रामपंचायत निवडणूक लागल्याबरोबर गाव पुढाऱ्यांना व गावकऱ्यांना आता मात्र त्यांची आठवण आली असून, "ताई, माई, अक्का, वहिनी, दादा, भाऊ, अण्णा, आबा, मामा गावाकडे कधी येणार? या वेळेस तरी गावी यावंच लागेल, जाण्या- येण्याच्या खर्चाबरोबरच इतरही बंदोबस्त केला जाईल' असेही सांगितले जात आहे. 

करमाळा तालुक्‍यासह जिल्हाभरात ग्रामपंचायत निवडणुकांचा चांगलाच धुरळा उडत असून, उन्हाळ्यापूर्वीच निवडणुकीचे वातावरण तापत आहे. 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. आलेल्या अर्जांची छाननी 31 डिसेंबर रोजी पार पडली, अर्ज माघारीची मुदत 4 जानेवारी असून त्यानंतर उमेदवारांना लगेच चिन्हांचे वाटप होणार आहे. निवडणूक निकालानंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असली तरी, मीच सरपंच होणार ! अशा आविर्भावात सर्वजण वावरू लागले आहेत. त्यातच या निवडणुकांकडे जिल्हा परिषद व पंचायत समितीची पूर्वतयारी समजली जाऊ लागल्याने तालुका पातळीवरील नेत्यांनी याकडे जातीने लक्ष दिले आहे. 

तालुक्‍यातील बहुतांश मंडळी पुणे, मुंबई व इतर शहरांकडे पोट भरण्यासाठी किंवा नोकरीच्या निमित्ताने गेलेले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी झाल्यानंतर ही गावाकडे आलेली मंडळी पुन्हा शहराकडे गेली आहेत. परंतु गावाकडच्या निवडणुकीसाठी त्यांची गरज असल्याने गावपुढारी, पॅनेल प्रमुख, उमेदवार त्यांना आता फोनद्वारे संवाद करून गावाकडे येण्यासाठी विनवणी करू लागले आहेत. "आम्ही अडचणीत होतो तेव्हा गावकऱ्यांनी आम्हाला निराश केले होते, आता आम्ही गावाकडे आलो तर त्यांना चालेल का', असा प्रतिप्रश्न आता ते विचारू लागले आहेत. त्यामुळे फोन करणाऱ्याची मात्र पंचाईत होऊ लागली आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक उमेदवार असल्याने निवडणूक अटीतटीची होते. त्यामुळे प्रत्येक मतदाराला महत्त्व प्राप्त होते. त्याकरिता शहराकडे गेलेले मतदार मतदानासाठी गावाकडे यावेत यासाठी त्यांना गळ घातली जात आहे. मध्यंतरी झालेल्या मन:स्तापाचा फटका या मतदारांकडून बसण्याची शक्‍यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे असे मतदार मतदानासाठी येणार का? हे ही पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

करमाळा तालुक्‍यातील निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये कुंभेज, अर्जुननगर, हिवरवाडी, मांगी, मिरगव्हाण, पाडळी, पांडे, पांगरे, पाथुर्डी, पोटेगाव, सांगवी, सरपडोह, शेलगाव (क), आळजापूर, बाळेवाडी, देवीचामाळ, गुळसडी, सौंदे, वडगाव, पुनवर, देवळाली, शेटफळ, बोरगाव, बिटरगाव श्री, पोथरे, घारगाव, हिवरे, निमगाव हवेली, उमरड, सावडी, मलवडी, भोसे, रोशेवाडी, फिसरे, करंजे, ढोकरी, कविटगाव, जेऊरवाडी, साडे, कोंढेज, सालसे, कुगाव, कोळगाव, जातेगाव, पिंपळवाडी, दिलेश्वर, झरे, आळसुंदे, नेरले, केडगाव, हिसरे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Candidates are calling for voting to people who have left the village for work