बेदरकार वाहनांमुळे प्राणी व पक्ष्यांचे होताहेत मृत्यू

प्रकाश सनपूरकर
Wednesday, 3 March 2021

पक्षी अभ्यासक व पर्यावरण अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार आणि पक्षीमित्र शिवानंद हिरेमठ यांनी आपल्या रोजच्या भ्रमंतीच्या वेळी केलेल्या सर्वेक्षणावरून ही माहिती दिली आहे. 

सोलापूर ः लॉकडाउन कालावधीत मुक्त संचार करणाऱ्या प्राण्यांची नंतरच्या काळात वाहनांच्या धडकेने मृत्यमुखी पडण्याची वेळ आली आहे. वाहनचालकांनी त्यासाठी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. 
पक्षी अभ्यासक व पर्यावरण अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार आणि पक्षीमित्र शिवानंद हिरेमठ यांनी आपल्या रोजच्या भ्रमंतीच्या वेळी केलेल्या सर्वेक्षणावरून ही माहिती दिली आहे. 
कोविड हा जीवघेणा रोग प्रसार करणाऱ्या कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने टाळेबंदी लागू केल्यानंतर माणसाच्या स्वैर वावरावर आळा बसला. परिणामी वन्यजीवांमध्ये चैतन्य निर्माण होऊन ते मुक्त विहार करत होते. निसर्गातील पक्षी व इतर वन्य प्राण्यांचा मुक्त वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला होता. मात्र नोव्हेंबर पासून टाळेबंदीला टप्प्याटप्प्याने शिथिलता दिल्यामुळे माणूस पुन्हा सक्रिय झाल्यामुळे ओस पडलेले रस्ते पुन्हा वाहनांच्या गर्दीने गजबजुन गेले. 
परिणामी अनावधानाने रस्त्यावर फिरणारे व रस्ते ओलांडणाऱ्या जंगली प्राण्यांच्या जिवावर बेतू लागले. विविध पक्ष्यांबरोबर कोल्हे, घोरफड, हरीण, मुंगूस, ऊदमांजर, साप, ससे, सरडे इत्यादी वन्यप्राणी वाहनांच्या धडकेने रस्त्यावर मृत्यू पावल्याचे दिसून येत आहेत. वन्यजीवांची हेटाळणी न करता वाहनधारकाने काळजीपूर्वक व लक्ष देऊन आपले वाहन चालवण्याची गरज आहे. 

भरधाव वाहनांचा बसतोय फटका 
गुळगुळीत झालेले नवीन रस्त्यांमुळे वाहनांचे वेग वाढले आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांना धडकून वा वाहनाखाली चिरडून मृत्यू पावणाऱ्या पक्षी व वन्यप्राण्यांची संख्या टाळेबंदी उठवल्यानंतर प्रमाण वाढल्याचे लक्षात आले. वाहन चालकांनी आपल्या वाहनावरील वेगावर नियंत्रण ठेवत मुक्‍या प्राण्यांना त्यांच्या स्वच्छंदी जीवनासाठी हातभार लावावे. 
- डॉ. अरविंद कुंभार, पर्यावरण अभ्यासक  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Careless driving kills animals and birds