संचारबंदीच्या कालावधीत आमदार करत आहेत घरात `हे` काम

प्रशांत देशपांडे
गुरुवार, 26 मार्च 2020

सध्या घरातच आहे. नागरिकांनाही घराबाहेर पडू नये, पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करतो. सध्या सकाळी नातीला घेऊन घराच्या अंगणात वॉकिंग करतो. तसेच नातीसमवेत वेळ घालवतो. घरातील कामांना हातभार लावतो. टीव्हीवरच्या बातम्या पाहत आहे. 
- विजयकुमार देशमुख, आमदार, शहर उत्तर सोलापूर 

सोलापूर : कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर सध्या भारतात लॉकडाउन असून महाराष्ट्रात संचारबंदी लागू केली आहे. सरकारने नागरिकांनी घराबाहेर जाऊ नये असे आवाहन केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील आमदार सध्या घरात कुटुंबासमवेत वेळ घालवत आहेत. तर काहीजण विधानसभेतील जुन्या नेत्यांच्या भाषणाच्या पुस्तकांचे वाचन करीत आहे. काही आमदार व्यायाम आणि नातवंडासमवेत वेळ घालवतानाचे चित्र दिसले. 

सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर सगळी भांवडं घरात एकत्र आहोत. त्यानिमित्त जुन्या आठवणींना उजाळा देत आहोत. तसेच नातवंडासमवेत वेळ घालवतो. सध्या जुन्या मित्रांशी फोनद्वारे विचारपूस करणे आणि गीतेचे वाचन सुरू आहे. 
- सुभाष देशमुख, आमदार, दक्षिण सोलापूर 

माढा मतदारसंघातील नागरिकांच्या फोनद्वारे अडचणी सोडवणे, त्यांना घराबाहेर पडू नका असे आवाहन करत आहे. शेतकऱ्यांना पालेभाजी पुणे, मुंबईला घेऊन जाण्यासाठी पोलिसांकडून पास उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. दररोज सकाळी योगा करणे व कुटुंबासमवेत वेळ घालविणे असा दिनक्रम सुरू आहे. 
- बननदादा शिंदे, आमदार, माढा 

घरात बसून नगरपालिकेच्या यंत्रणांना सूचना देतो, कोरोना व्हायरच्या पार्श्‍वभूमीवर कोणत्या उपाययोजना केल्या याची माहिती घेतो. तसेच तालुक्‍यातील नागरिकांच्या अडचणी सोडवतो. सकाळ-संध्याकाळ गावात फिरून काही अडचणी सोडवणे, त्रृटी असल्यास प्रशासनाला सांगतो. 
राजेंद्र राऊत, आमदार बार्शी 

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एवढा निवांत वेळ प्रथमच मिळाला आहे. माझे मोठे कुटुंब आहे. आजही आम्ही एकत्र राहतो. त्यांच्याशी विचारांची देवाण-घेवाण करणे तसेच अधिकाऱ्यांशी फोनद्वारे बोलतो. नागरिकांना कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर बाहेर पडू नका असे आवाहन केले. तसेच विधानसभेत दिलेल्या पुस्तकांचे वाचन सुरू आहे. 
- यशवंत माने, आमदार, मोहोळ 

कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर घराबाहेर जाणे शक्‍य नसल्याने सकाळी आणि संध्याकाळी एक तास व्यायाम करतो. कुटुंबातील सदस्यांसमवेत नाश्‍ता आणि जेवण करणे. जुन्या मित्रांशी संवाद करतो. फोनद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद करतो. नागरिकांना बाहेर पडू नये, असे आवाहन करतो. 
संजय शिंदे, आमदार, करमाळा 

निवडणूक कालावधीत व्यायाम बंद झाला होता. मात्र, सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर घरातच असल्याने सकाळी योगासन, व्यायाम करतो. विधासभेतील जुन्या नेत्यांची भाषण वाचणे, ऐकणे आणि कुटुंबाला वेळ देणे, मतदारसंघातील नागरिकांशी फोनद्वारे संवाद साधणे सुरू आहे. 
सचिन कल्याणशेट्टी, आमदार अक्कलकोट

कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर घरात बसून सकाळी व्यायाम, योगा करत आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांत मतदारसंघातील अडकलेल्या नागरिकांशी संपर्क साधून त्यांना तेथेच थांबण्याची सूचना देऊन त्यांची सोय करत आहे. विधानसभेतील जुन्या नेत्यांचे भाषण एकणे, त्यांच्या पुस्तकांचे वाचन करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ज्योती पुंज पुस्तक सध्या वाचत आहे. 
- राम सातपुते, आमदार, माळशिरस 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in carfew mla of solapur in house relax mood