esakal | पंढरपूरच्या नूतन उपसभापतींची मिरवणूक पडली महागात ! राजश्री भोसले यांच्यासह पती व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

बोलून बातमी शोधा

Pdr_procession}

पंचायत समितीच्या उपसभापती राजश्री पंडितराव भोसले यांची निवड झाल्यानंतर तालुक्‍यातील ओझेवाडी येथे बुधवारी (ता. 3) रात्री कोरोना नियमांची पायमल्ली करत मिरवणूक काढण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन उपसभापती राजश्री भोसले, त्यांचे पती पंडित बाबूराव भोसले यांच्यासह मिरवणुकीत सहभागी झालेल्या 36 कार्यकर्त्यांसह अन्य तीस ते चाळीस लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पंढरपूरच्या नूतन उपसभापतींची मिरवणूक पडली महागात ! राजश्री भोसले यांच्यासह पती व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
sakal_logo
By
अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : पंचायत समितीच्या उपसभापती राजश्री पंडितराव भोसले यांची निवड झाल्यानंतर तालुक्‍यातील ओझेवाडी येथे बुधवारी (ता. 3) रात्री कोरोना नियमांची पायमल्ली करत मिरवणूक काढण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन उपसभापती राजश्री भोसले, त्यांचे पती पंडित बाबूराव भोसले यांच्यासह मिरवणुकीत सहभागी झालेल्या 36 कार्यकर्त्यांसह अन्य तीस ते चाळीस लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

कोरोनाचे रुग्ण वाढत असताना नियमांचे पालन करण्याऐवजी जबाबदार लोकप्रतिनिधीनेच जेसीबी यंत्रासह डॉल्बीच्या कर्णकर्कश्‍श आवाजात मिरवणूक काढल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

पंढरपूर तालुका पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदी राजश्री भोसले यांची बुधवारी (ता. 3) बिनविरोध निवड करण्यात आली होती. गेल्या अनेक वर्षांपासून ओझेवाडी आणि लगतच्या गावांच्या विकासासाठी भोसले या सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यामुळे एक उत्तम महिला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची प्रतिमा आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची उपसभापती म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना आनंद झाला आणि सौ. भोसले यांच्या ओझेवाडी गावात मोठा जल्लोष करत त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी जेसीबीचा वापर करत मिरवणूक काढली. या वेळी फटाक्‍यांची आतषबाजी करत गुलालाची मुक्त उधळणही करण्यात आली. मिरवणुकीत डॉल्बीसदृश स्पीकरचा वापर करण्यात आल्याने सारा परिसर दणाणून गेला होता. मिरवणुकीत मास्क न लावता मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. 

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन उपसभापती राजश्री भोसले, त्यांचे पती पंडित भोसले यांच्यासह मिरवणुकीत सहभागी झालेल्या 36 कार्यकर्त्यांसह अन्य तीस ते चाळीस लोकांच्या विरोधात आज रात्री गुन्हा दाखल केला. संबंधितांनी बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केले. संगमताने मिरवणूक काढून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या शासनाच्या उपाययोजनांमध्ये व्यत्यय आणून जीवितास धोका असलेल्या कोरोना रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली हयगयीची कृती केली म्हणून पोलिसांनी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल