"प्रहार'च्या सातजणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा 

तात्या लांडगे 
Thursday, 29 October 2020

खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून इब्राहिम तांबोळी (रा. उंबरे पागे, ता. पंढरपूर) हे मंगळवारी (ता. 27) जिल्हाधिकारी कार्यालयातील मोबाईल टॉवरवर चढले. त्यांना खाली येण्याची विनवणी करत जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी मुन्याप्पा सिद्राम बज्जर (रा. सिद्धेश्‍वर पेठ) हे टॉवरवर चढले. त्या कारणावरून प्रहार संघटनेच्या सातजणांनी त्यांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याची फिर्याद बज्जर यांनी सदर बझार पोलिसांत दिली. 

सोलापूर : खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून इब्राहिम तांबोळी (रा. उंबरे पागे, ता. पंढरपूर) हे मंगळवारी (ता. 27) जिल्हाधिकारी कार्यालयातील मोबाईल टॉवरवर चढले. त्यांना खाली येण्याची विनवणी करत जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी मुन्याप्पा सिद्राम बज्जर (रा. सिद्धेश्‍वर पेठ) हे टॉवरवर चढले. त्या कारणावरून प्रहार संघटनेच्या सातजणांनी त्यांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याची फिर्याद बज्जर यांनी सदर बझार पोलिसांत दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील टॉवरवर चढलेल्या तांबोळी यांना खाली उतरा, तुमच्या मागणीवर मार्ग काढता येईल, अशी विनवणी करीत त्यांना आंदोलन करण्यापासून बज्जर रोखत होते. त्याच वेळी बज्जर स्वत: टॉवर चढले. काही वेळाने प्रहार संघटनेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाले. ते बज्जर यांना खाली उतर नाहीतर तुला बघून घेतो, म्हणून दमदाटी करू लागले. तू खाली ये, त्याला मरू दे, असेही ते म्हणाले. त्यानंतर बज्जर खाली उतरताच सातजणांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली, असेही फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार अजित कुलकर्णी, दत्ता मस्के- पाटील, खलिल मणियारसह अन्य चौघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गंपले करीत आहेत. 

आज काम बंद आंदोलन 
कर्मचारी संघटनेच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. वाहन चालक मुन्ना बज्जर यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या सोलापूर शाखेच्या वतीने बुधवारी काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. आज (गुरुवारी) एक दिवसाचे काम बंद आंदोलन करण्यात असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. शंतनू गायकवाड, प्रवीण शिरशीकर, जयंत जुगदार, अमरनाथ भिगे, संदीप लटके, अविनाश गायकवाड, लक्ष्मीकांत आयगोळे, सोमनाथ ताटे, बंदीश वाघमारे यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A case has been registered against seven members of the Prahar Sanghatna for obstructing government work