
फिर्यादी (वय 27, रा. औंढी, ता. मोहोळ) यांच्याकडे त्यांची अल्पवयीन भाची राहण्यास होती. तिच्या आई - वडिलांनी फिर्यादीच्या घरी येऊन "आम्ही आमच्या मुलीस दोन दिवस तारापूर (ता. पंढरपूर) येथे घेऊन जातो' असे सांगून घेऊन गेले होते.
पंढरपूर (सोलापूर) : अल्पवयीन मुलीचा विवाह केल्या प्रकरणी संबंधित मुलीचे आई - वडील यांच्यासह आठ जणांच्या विरुद्ध पंढरपूर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी संबंधित अल्पवयीन मुलीच्या मामाने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.
या प्रकरणाची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की यातील फिर्यादी यांची अल्पवयीन भाची त्यांच्याकडे राहण्यास होती. तिच्या आई - वडिलांनी फिर्यादीच्या घरी येऊन "आम्ही आमच्या मुलीस दोन दिवस तारापूर (ता. पंढरपूर) येथे घेऊन जातो' असे सांगून घेऊन गेले होते. यातील अल्पवयीन मुलीने फिर्यादीच्या पत्नीच्या मोबाईलवर "मामा, माझे बळजबरीने घरातील लोक लग्न लावून देत आहेत, तुम्ही मला न्यायला या' अशी व्हॉइस क्लिप पाठवली होती.
ही क्लिप फिर्यादीने ऐकल्याने फिर्यादी हे तारापूर येथे गावी गेले. परंतु तारापूर गावातील घरास कुलूप दिसले. त्यानंतर फिर्यादीने अल्पवयीन मुलीच्या आई - वडिलांना फोन केला असता मोबाईल बंद होता. त्यानंतर गुरुवारी (ता. 7) तारापूर येथे घरी आले. फिर्यादीने विचारणा केली असता यातील आरोपींनी मुलीचे लग्न केल्याचे सांगितले.
याप्रकरणी मुलीच्या मामाने पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुलीच्या आई - वडिलांसह या आठ आरोपींच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, गुन्ह्याचा तपास पंढरपूर तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल नितीन चवरे हे करीत आहेत.
संपादन : श्रीनिवास दुध्याल