'नको देवराया अंत आता पाहू' वारकऱ्यांची यंदा दुहेरी खंत 

संतोष कानगुडे 
सोमवार, 29 जून 2020

कोरोनाचे संकट दूर व्हावे 
दरवर्षी आषाढशुद्ध प्रतिपदा ते नवमी वारकऱ्यांची गर्दी, दिंड्या, पताका, टाळ, मृदंगाचा आवाज, हरिनामाचा गजर यामुळे वातावरण कसे भक्तिभावाने भरलेले असत. वारकरी एकमेकांचा चरणस्पर्श करून माउली... माउली... आदराने म्हणतात. यंदा मात्र सगळं शांतच आहे. अलिकडच्या अनेक वर्षांत असे घडले नाही. आता देवानेही भक्ताची आर्त हाक ऐकावी, कोरोनाच संकट लवकर दूर करावं एवढीच प्रार्थना. 
- गिरीश केसकर, वारकरी, पानगाव, ता. बार्शी 

पानगाव (सोलापूर) : यंदा आषाढी एकादशीनिमित्त लाडक्‍या विठुरायाचे पंढरपुरात जाऊन प्रत्यक्ष दर्शन करता येणार नसल्याने लाखो विठ्ठलभक्त वारकऱ्यांचे मन बेचैन आहे. कोरोनाने पालखी सोहळे व वारी रद्द झाली आहे. वारी करता आली नाही याची खंत भक्तांच्या मनात आहे. दुसरीकडे एकादशीनंतर द्वादशीला दक्षिण काशी बार्शीत होणारा उत्सवही यंदा रद्द करण्यात आला आहे. अनेक दशकांतून पहिल्यांदाच हा उत्सव पाहण्यात येणार नाही, हे देखील दु:ख भक्तांच्या मनात आहे. म्हणूनच या परिस्थितीवर "नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे', अशी विनवणी संत कान्होपात्रा यांच्या ओळीच्या माध्यमातून भक्त करत आहेत. त्यामुळे राज्यातूनच नव्हे तर देशातूनही कोरोना पूर्णपणे हद्दपार व्हावा, अशी भक्तांची यामागची भावना आहे. 
कशास काशी, गया, आयोध्या जावे रामेश्‍वरी, असता श्रीहरी आमुचे घरी अशी दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या बार्शीच्या भगवंताची महती आहे. आषाढी एकादशीच्या कालावधीत भक्तांनी गजबजलेले मंदिर, दर्शनासाठी लागणाऱ्या मोठ्या रांगा, मैदानावरचा उत्सव, त्यासाठीची करण्यात येणारी तयारी, परिसरात सजलेली दुकाने, बार्शीत दाखल होणाऱ्या शेकडो लहान-मोठ्या दिंड्या, भक्तिभावात तल्लीन होऊन टाळ मृदंगाच्या तालावर डोलणारे वारकरी, बस स्थानकात वारकऱ्यांची होणारी गर्दी, यापैकी काहीही यावेळी कोरोना महामारीने दिसून येत नाही. त्यामुळे भक्तांची मने सुन्न होत आहेत. यामुळे संत कान्होपात्राच्या वरील ओळी वारकऱ्यांच्या तोंडातून आपोआप बाहेर पडत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrations in South Kashi Barshi along with Ashadhi Wari of Pandharpur also canceled