मोठी ब्रेकिंग ! महापालिकेतील सात विषय समित्यांचे ठरले सभापती

solapur
solapur

सोलापूर : महापालिकेतील सात विषय समित्यांचा तोडगा निघाला असून शिवसेनेने महिला व बालकल्याण समिती घेऊन अन्य मित्र पक्षांना सहा समित्या सोडून दिल्या आहेत. आता भाजप 'एकला चलो रे' च्या भूमिकेत असून मतदानापर्यंत काहीतरी चमत्कार घडेल, असा विश्‍वास भाजपला असल्याची चर्चा आहे. आमदार संजय शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर एमआयएम आणि वंचित बहूजन आघाडीसह शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेत्यांनी हातमिळविणी करुन तोडगा काढला आहे.

सभापतीपदांचे संभाव्य दावेदार 
महिला व बालकल्याण : मिरा गुर्रम (शिवसेना) 
विधी व स्थापत्य : विनोद भोसले अथवा वाहिदाबी शेख, अनुराधा काटकर (कॉंग्रेस) 
मंडई, उद्यान : गणेश पुजारी (वंचित बहूजन आघाडी) 
कामगार व समाजकल्याण : सुनिता रोटे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) 
शहर सुधारणा, वैद्यकीय : शहाजीदाबानो शेख, वहिदाबानो शेख (एमआयएम) 

महापालिकेत शिवसेनेचे 21, कॉंग्रेसचे 14, एमआयएमचे नऊ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार तर वंचित बहूजन आघाडीचे तीन नगरसेवक आहेत. विषय समित्यांच्या निवडीसाठी महाविकास आघाडीकडे पाच तर भाजपकडे चार मते आहेत. पदवीधर व शिक्षक आमदारकीपूर्वी गटनेते चेतन नरोटे यांच्यासह शिवसेनेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे आदींनी विषय समित्यांच्या सदस्यांची नावे निश्‍चित केली. त्यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांना सर्वच विषय समित्या आताच अंतिम करुन निवडी जाहीर करण्याची मागणीही केली होती. मात्र, त्यावेळी महापौरांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना विचारुन निर्णय घेऊ असे स्पष्ट केले. त्यानंतर पदवीधर व शिक्षक आमदारकी निवडणुकीत महाविकास आघाडीला भरघोस यश मिळाल्याने महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्‍वास बळावला. त्यावेळी आमदार संजय शिंदे यांनीच महाविकास आघाडीसह एमआयएमचे नेते तौफिक शेख यांनाही सोबत घेतले होते. आता तोच प्रकार पुन्हा अनुभवायला मिळाला आणि संजय शिंदे यांची मध्यस्थी पुन्हा एकदा यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, विधी व न्याय समितीसाठी विनोद भोसले किंवा वाहिदाबी शेख यांची नावे चर्चेत आहेत. दुसरीकडे सुनिता रोटे यांना कामगार व समाजकल्याण अथवा विधी समितीपैकी एक समिती मिळणार आहे. 


फुटाफुटी होऊ नये म्हणून सावध पवित्रा 
भाजपने 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली असून महाविकास आघाडीतील प्रमुख तिन्ही पक्षांनी एमआयएम आणि वंचित बहूजन आघाडीला सोबत घेतले आहे. मात्र, समित्यांचे सभापती आणि समित्यांवरुन असमाधानी असलेले मतदानावेळी दगाफटका करणार नाहीत, याची दक्षता घेत शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, एमआयएम आणि वंचित बहूजन आघाडीच्या गटनेत्यांची दुसऱ्यांदा बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांचे समाधान करुन सभापतींना एकच वर्षाचा कालावधी मिळणार असल्याने सर्वजण एकत्रित आलो तर पुढे आपलीच सत्ता महापालिकेत असेल आणि त्यानंतर पुढच्यावेळी सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे पदे मिळतील, अशीही चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तर वंचित बहूजन आघाडीचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी विषय समित्यांच्या निवडीत कोणासोबत जायचे, याबाबत पक्षाचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे विचारणा केली आहे. त्यावर आज (सोमवारी) निर्णय अपेक्षित असून त्यानंतर गटनेते चंदनशिवे निर्णय घेणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com