"ये तो झॉंकी है, आगे और लढाई बाकी है !' चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला इशारा 

दत्तात्रय खंडागळे 
Friday, 27 November 2020

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वसामान्य जनता जेरीस आली आहे. शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करावी लागली. महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. शाळा सुरू करण्याचा बट्ट्याबोळ झाला आहे. विधान परिषदेच्या सर्वच जागांवर भाजपचा विजय निश्‍चित आहे. ही निवडणूक म्हणजे "ये तो झॉंकी है, आगे और लढाई बाकी है', असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला दिला.

सांगोला (सोलापूर) : पदवीधर आमदार असताना बारा वर्षांच्या काळात अनेक कामे मार्गी लावली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वसामान्य जनता जेरीस आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घोषणा करण्यात यशस्वी झाले; पण प्रत्यक्षात मदत करण्यात अपयश आल्याने शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करावी लागली. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. शाळा सुरू करण्याचा बट्ट्याबोळ झाला आहे. विधान परिषदेच्या सर्वच जागांवर भाजपचा विजय निश्‍चित आहे. ही निवडणूक म्हणजे "ये तो झॉंकी है, आगे और लढाई बाकी है', असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला दिला. 

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला येथे भाजपचा मेळावा पार पडला. त्या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील बोलत होते. या वेळी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत पाटील, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, मोहन डांगरे, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, नगराध्यक्षा राणी माने, संभाजी आलदर, गजानन भाकरे, शिवाजीराव गायकवाड, डॉ. जयंत केदार, राजश्री नागणे, रासपचे सोमा मोटे, रयत क्रांती संघटनेचे भारत चव्हाण यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

श्री. पाटील पुढे म्हणाले, नागपूर, मराठवाडा व पुणे पदवीधर, अमरावती व पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अटीतटीची लढाई आहे. भाजप सरकारच्या काळात 50 हजार शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावला. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले. धनगर समाजासाठी 22 योजना सुरू केल्या. संपर्कासाठीची ही निवडणूक असून, कॉंग्रेसवाल्यांसारखी आरोप करण्यासारखी निवडणूक नाही. माझं नाव घेतल्याशिवाय कॉंग्रेसच्या नेत्यांना झोप लागत नाही. त्यांना झोपेच्या गोळ्याऐवजी चंद्रकांत पाटील हे नाव घ्या, असा सल्ला डॉक्‍टरांनी विरोधकांना दिला आहे. ऊर्जामंत्र्यांनी 100 युनिटपर्यंत वीजबिल माफीची घोषणा केली; मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तो प्रस्ताव धुडकावून लावला. 

प्रारंभी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान दिन साजरा करण्यात आला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil gave a warning to the government at the BJP rally